मुंबईचे महापौरपद खुल्या प्रवर्गाला गेल्याने ठाकरे गटाचा राडा; चक्राकार पद्धत पाळली नसल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:04 IST2026-01-22T12:50:16+5:302026-01-22T13:04:32+5:30
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर महापालिकेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला.

मुंबईचे महापौरपद खुल्या प्रवर्गाला गेल्याने ठाकरे गटाचा राडा; चक्राकार पद्धत पाळली नसल्याचा आरोप
BMC Mayor Reservation: राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निकालानंतर महापौरपदासाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलं आहे. सर्वात चर्चेत असलेल्या मुंबई महापालिकेची देखील सोडत काढण्यात आली असून मुंबई शहराचे महापौरपद खुला महिला प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या सोडतीवरुन ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. आरक्षण सोडत पद्धतीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्यामुळे मंत्रालयात मोठा गोंधळ पाहायला मिळाला.
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठीच्या आरक्षणाची सोडत अखेर जाहीर करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेचं महापौरपद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झालं आहे. मात्र ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसुतकर, निशिकांत शिंदे, राखी जाधव यांनी आक्षेप घेतला. आरक्षण सोडत पद्धतीमध्ये चक्राकार पद्धत पाळली गेली नसल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेने केला आहे. २०१९ आणि २०२२ या गेल्या दोन वेळेस सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असताना आता पुन्हा सर्वसाधारण गटासाठी आरक्षण का निघालं? असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या आक्षेपाची नोंद घेऊन सोडत झाल्यानंतर याबाबत विचार करु असं म्हटलं आहे.
ठरवून लॉटरी काढली- किशोरी पेडणेकर
"२०१९, २०२२ मध्ये सर्वसाधारण गटाचा महापौर होता. आता ओबीसीकडे यायला पाहिजे होतं. ओबीसींवर अन्याय केला. निवडणूक व्हायच्या आधी अनुसुचित जातीचे किती असायला पाहिजे असा नियम बनवला होता आणि आता अनुसुचित जमातीचे तीन नगरसेवकअसायला पाहिजे, असा नियम बनवला. तुम्ही जाणूनबुजून आमच्याकडे अनुसुचित जमातीचे दोन उमेदवार असल्याने बृहन्मुंबईमध्ये हा नियम लावला. याचा अर्थ लॉटरी ठरवून केली आहे. म्हणून ही संपूर्ण लॉटरी सिस्टीम आणि निवडणूक प्रक्रियेचा आम्ही निषेध करतो," असं किशोरी पेडणेकर म्हणाले.
महापौर आरक्षण सोडत
मुंबई - खुला प्रवर्ग (Open) - सर्वसाधारण (महिला) आरक्षण
नवी मुंबई - खुला प्रवर्ग (Open) - सर्वसाधारण (महिला) आरक्षण
ठाणे - अनुसूचित जाती प्रवर्ग (SC)
मिरा-भाईंदर - खुला प्रवर्ग (Open) - सर्वसाधारण (महिला) आरक्षण
कल्याण-डोंबिवली - अनुसूचित जमाती प्रवर्ग (ST)
उल्हासनगर - ओबीसी प्रवर्ग (OBC)
वसई-विरार - खुला प्रवर्ग (Open) - सर्वसाधारण
भिवंडी-निजामपूर - खुला प्रवर्ग (Open) - सर्वसाधारण (महिला) आरक्षण
पनवेल - ओबीसी प्रवर्ग (OBC)
नाशिक - खुला प्रवर्ग (Open) - सर्वसाधारण (महिला) आरक्षण
अहिल्यानगर - ओबीसी प्रवर्ग (OBC) - (महिला)साठी राखीव
मालेगाव - खुला प्रवर्ग (Open) - सर्वसाधारण (महिला) आरक्षण
जळगाव - ओबीसी प्रवर्ग (OBC) - (महिला)साठी राखीव
धुळे- खुला प्रवर्ग (Open) - सर्वसाधारण (महिला) आरक्षण
नागपूर - खुला प्रवर्ग (Open) - सर्वसाधारण
अकोला - ओबीसी प्रवर्ग (OBC) - (महिला)साठी राखीव
अमरावती - खुला प्रवर्ग (Open) - सर्वसाधारण
चंद्रपूर - ओबीसी प्रवर्ग (OBC) - (महिला)साठी राखीव
पुणे - खुला प्रवर्ग (Open) - सर्वसाधारण (महिला) आरक्षण
पिंपरी-चिंचवड - खुला प्रवर्ग (Open) - सर्वसाधारण (महिला) आरक्षण
सांगली - खुला प्रवर्ग (Open) - सर्वसाधारण
कोल्हापूर - ओबीसी प्रवर्ग (OBC)
इचलकरंजी - ओबीसी प्रवर्ग (OBC)
सोलापूर - खुला प्रवर्ग (Open) - सर्वसाधारण
छत्रपती संभाजीनगर - खुला प्रवर्ग (Open) - सर्वसाधारण
परभणी - खुला प्रवर्ग (Open) - सर्वसाधारण
जालना - अनुसूचित जाती प्रवर्ग (SC) - (महिला)साठी राखीव
लातूर - अनुसूचित जाती प्रवर्ग (SC) - (महिला)साठी राखीव
नांदेड - खुला प्रवर्ग (Open) - सर्वसाधारण (महिला) आरक्षित