Join us

“ओमायक्रॉनमुळे सगळ्यांनीच सतर्क होण्याची गरज, मुंबई महापालिका सज्ज”: किशोरी पेडणेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 17:55 IST

जे करता येईल, ते करा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

मुंबई: कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगात भीतीचे वातावरण आहे. दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम नवा व्हेरिएंट आढळून आला. त्यामुळे आफ्रिकेचा समावेश ऍट रिस्क देशांच्या यादीत करण्यात आला आहे. भारतातील विमानतळावर दाखल झाल्यानंतर प्रवाशांना १४ दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात आहे. मात्र गेल्या २० दिवसांत दक्षिण आफ्रिकेतून भारतात दाखल झालेल्यांची संख्या मोठी आहे. या आकडेवारीने प्रशासनाची चिंता वाढली आहे. यातच आता मुंबई महानगरपालिकेच्या महापौर यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहण्याची गरज असून, नव्या व्हेरिएंटशी लढा देण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज असल्याचा दावा केला आहे. 

जे करता येईल ते ते करा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. लॉकडाऊन कोणालाच नको आहे, मात्र नियमावली पाळा. आता सगळ्यांनीच सतर्क होण्याची गरज आहे,  कोविड सेंटर सज्ज आहेत. कोरोनचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर , नर्सेसचा स्टाफ आपल्याकडे आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. 

शाळा सुरू करण्याबाबत आयुक्त उत्सुक नव्हते

लहान मुलांचे लसीकरण झाले नाही आणि पालक सुद्धा मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नव्हते. शाळा सुरू करण्याबाबत आयुक्त उत्सुक नव्हते, असे सांगत कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे काही कोविड सेंटर बंद ठेवली होती. मात्र, आता ती पुन्हा सरु करण्यासाठी महापालिका सज्ज आहे, असेही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. 

दरम्यान, १० नोव्हेंबरपासून १ हजार प्रवासी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत दाखल झाल्याची आकडेवारी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी सांगितली. या आकडेवारीमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. दक्षिण आफ्रिकेतून दाखल झालेल्या हजार प्रवाशांपैकी किती जण मुंबईत आहेत, किती जण शहराबाहेर गेले, ते कोणाच्या संपर्कात आले, याचा शोध आता घेतला जाणार आहे. त्यासंदर्भातील माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याओमायक्रॉनमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकिशोरी पेडणेकर