मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस एका डब्याशिवाय धावली; प्रवाशांची कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 09:22 IST2025-10-09T09:21:48+5:302025-10-09T09:22:05+5:30
Mumbai-Madgaon Janshatabdi Express: मध्य रेल्वेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह, मुंबईतून कोकणात जाण्यासाठी असलेल्या जनशताब्दीची इंजिनसह १६ डबे अशी संरचना आहे. ‘शताब्दी’ गाडीच्या धर्तीवर निर्माण करण्यात आलेली गाडी कोकणवासीयांच्या प्रथम पसंतीची ठरली आहे.

मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस एका डब्याशिवाय धावली; प्रवाशांची कोंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई-मडगाव मार्गावरील जनशताब्दी एक्स्प्रेस बुधवारी ‘डीएल १’ या डब्याशिवाय धावली. यामध्ये २४ प्रवाशांचे आरक्षण होते. आपला डबाच एक्स्प्रेसला जोडला नसल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रवाशांनी तातडीने तिकीट तपासनीसकडे धाव घेत हा प्रकार मांडला. अपुऱ्या रेल्वेगाड्यांमुळे मुंबई-कोकण मार्गावरील रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत असतानाच आता तांत्रिक अडचणीचे कारण देत थेट एक्स्प्रेसला डबाच जोडला नव्हता. या प्रवाशांना नंतर अन्य डब्यात व्यवस्था करण्यात आली. या प्रकारामुळे मध्य रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबईतून कोकणात जाण्यासाठी असलेल्या जनशताब्दीची इंजिनसह १६ डबे अशी संरचना आहे. ‘शताब्दी’ गाडीच्या धर्तीवर निर्माण करण्यात आलेली गाडी कोकणवासीयांच्या प्रथम पसंतीची ठरली आहे. परंतु बुधवारी घडलेल्या प्रकारामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. काही प्रवाशांनी रेल्वे मदत ॲपवर तक्रार दाखल केली. त्यावेळी तांत्रिक अडचणींमुळे गाडीला डबा जोडला गेला नसल्याचे उत्तर प्रवाशांना ॲपद्वारे मिळाले.
प्रशासनाचे म्हणणे काय?
जनशताब्दीमधील ‘डी-१’ हा पॉवर कारचा जोड डबा होता. यात आसन क्षमता ३५ आहे. त्यात साधारण २४ प्रवाशांचे आरक्षण होते. तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांना प्रवास आवश्यक असल्याने त्यांना पर्यायी डब्यांमध्ये जागा देण्यात आली, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी सांगितले.
जनशताब्दी एक्स्प्रेसमधील अन्य डब्यात १७५ रिकामी आसने आहेत. यामुळे परतीच्या प्रवासात ‘डी-१’मधील प्रवाशांची सोय केली, असे कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी स्पष्ट केले.
कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या
मध्य रेल्वेचा हा निष्काळजीपणा आहे. संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा प्रकार निदर्शनास आणून द्यायला हवा होता. तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ अशा दोन्ही प्रकाराने जनशताब्दीचे तिकीट घेता येते. या आधीदेखील जनशताब्दी गाडी प्रवासी तक्रारी वाढल्या आहेत. मुळात जनशताब्दी सारख्या प्रीमियम सेवेच्या डब्यांचे साधारण एक्स्प्रेसच्या गाडीच्या डब्यांसाठी दुहेरी वापर करणे, हेच मुळात अयोग्य आहे, असे अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी सांगितले.