Mumbai Local Train: मुंबईकरांनो, रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, पश्चिम रेल्वेच्या १०२ लोकल फेऱ्या रद्द!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 13:08 IST2026-01-20T13:08:30+5:302026-01-20T13:08:30+5:30
Mumbai Local Western Railway Update: आज पश्चिम रेल्वेवर प्रवास करण्याच्या विचारात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कांदिवली कारशेडमधील तांत्रिक देखभालीच्या कामामुळे आणि मालाड-कांदिवली दरम्यानच्या वेगमर्यादेमुळे एकूण १०२ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Mumbai Local Train: मुंबईकरांनो, रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, पश्चिम रेल्वेच्या १०२ लोकल फेऱ्या रद्द!
मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आजचा दिवस त्रासाचा ठरणार आहे. कांदिवली कारशेडमधील तांत्रिक देखभालीचे काम आणि वेगमर्यादेमुळे रेल्वे प्रशासनाने आज १०२ उपनगरीय लोकल फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली कारशेड येथे तांत्रिक देखभालीचे अत्यंत महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे कारशेडमधून गाड्यांची ये-जा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. याचा थेट परिणाम रेल्वेच्या नियमित कामकाजावर झाला असून दिवसभर अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत.
याव्यतिरिक्त, कांदिवली ते मालाड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन दोन्ही जलद मार्गांवर गाड्यांच्या वेगावर मर्यादा आणण्यात आली आहे. यामुळे धावणाऱ्या गाड्याही निर्धारित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये १२ डब्यांच्या लोकल (८३ फेऱ्या रद्द) आणि १५ डब्यांच्या लोकल (१४ फेऱ्या रद्द) यांचा समावेश आहे. तर, काही निवडक रेकचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द झाल्यामुळे उपलब्ध असलेल्या लोकलवर, विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत प्रचंड ताण येणार आहे.
प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाचे आवाहन
- स्थानकावर जाण्यापूर्वी अधिकृत रेल्वे ॲप किंवा सोशल मीडिया हँडल्सवर गाड्यांचे स्टेटस तपासा.
- सेवांचे नियमन केले जात असल्याने प्रवाशांना स्थानकावर जास्त वेळ थांबावे लागू शकते.
- शक्य असल्यास मेट्रो किंवा बेस्ट बस सेवेचा वापर करून गर्दी टाळण्याचा प्रयत्न करा.