मुंबईकरांना मिळणार नवी लोकल! कसं असेल डिझाइन? प्रवाशांना काय फायदा? जाणून घ्या सारंकाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 13:31 IST2025-02-07T13:29:16+5:302025-02-07T13:31:06+5:30
Mumbai local trains get upgrade 2025: मुंबईकरांना यंदाच्या वर्षात नव्या धाटणीची लोकल मिळणार आहे.

मुंबईकरांना मिळणार नवी लोकल! कसं असेल डिझाइन? प्रवाशांना काय फायदा? जाणून घ्या सारंकाही...
मुंबईकरांना यंदाच्या वर्षात नव्या धाटणीची लोकल मिळणार आहे. चाकरमान्यांची लाइफलाइन म्हणून ओळखली जाणाऱ्या लोकलमध्ये आतापर्यंत प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने अनेकदा बदल करण्यात आलेत. तोच धागा कायम ठेवत नव्या लोकलचं डिझाइन असणार आहे. नवीन डिझाइनच्या लोकल आण दोन गाड्यांमधील वेळेतील अंतर कमी केल्यामुळे लवकरच मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत मोठे बदल दिसून येतील, असा विश्वास रेल्वे प्रशासनानं व्यक्त केला आहे.
वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर लोकलच्या डिझाइनमध्ये बदल केले जातील. प्रवाशांनी तुडूंब भरुन चालणाऱ्या लोकल आपण रोज पाहतो. त्यामुळे लोकलच्या डब्यात प्रवाशांसाठी हवा खेळती राहिल यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्यामुळे नव्या डब्यांची रचना अधिक मोकळी असेल. म्हणजेच सध्याच्या ईएमयू लोकलच्या तुलनेत नव्या डब्यामध्ये जास्त जागा असेल. त्यासोबत लोकल डब्यातील वेंटिलेशन प्रणाली अपडेट केली जाणार आहे.
रिअल टाइम पॅसेंजर सिस्टम, स्वयंचलित दरवाजा आणि सर्वोत्तम वेंटिलेशनची प्रणाली यावर काम केलं जात आहे. प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी टाळण्यासाठी दोन गाड्यांमधील अंतर कमी केलं जाणार आहे. सध्या दोन लोकल गाड्यांमधील अंतर १८० सेकंद इतकं आहे. ते कमी करुन १२० सेकंदांवर आणण्याचा म्हणजे दोन मिनिटांवर आणण्याचा रेल्वेचा मानस आहे. त्यादृष्टीनं प्रयत्न देखील सुरू केले गेले आहेत. दोन गाड्यांमधील वेळ कमी झाला तर आपोआप लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करणं शक्य होईल. यामुळे पिक अवर्समध्ये गर्दीचं नियोजन करणं सोपं होणार आहे.
बॅक्टेरिया मुक्त ऑक्सिजन क्लीनिंग मशीन
हवेची गुणवत्ता आणि प्रवाशांचे आरोग्य सुधारण्यासाठी नवीन गाड्या VB (व्हेंटिलेशन बेस्ड) प्रणालीवर आधारित बनवल्या जातील. ज्यात अत्याधुनिक वेंटिलेशन सिस्टीम असेल. जे बॅक्टेरिया-मुक्त ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी हवा फिल्टर करेल. डब्यातील वेंटिलेशन सिस्टममध्ये सुधारणा केल्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. नव्या लोकलच्या डब्यांमध्ये ९९.९९% बॅक्टेरियामुक्त ऑक्सिजन प्रणाली वापरल्याने हवेतील दूषित घटक आणि बॅक्टेरिया कमी होतील अशी अपेक्षा आहे. ज्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता वाढेल, विशेषतः गर्दीच्या आणि लांबच्या प्रवासात याचा फायदा होईल. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दैनंदिन जीवनासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.