सीवूड्स दारावे आणि नेरूळ रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे आज पहाटे हार्बर लाईन विस्कळीत झाली. परिणामी, वाशी ते बेलापूरदरम्यान वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या. मात्र, आता मध्य रेल्वेने मुंबई लोकल ट्रेन सेवा पूर्णपणे पूर्ववत करण्यात आल्याची माहिती दिली. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी पहिली लोकल सकाळी ६.०२ वाजता सुटली. तर, सीएसएमटीहून पनवेलकडे जाणारी पहिली लोकल सकाळी ५.०६ वाजता सुटली. सीवूड्स दारावे आणि नेरूळ रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे वाशी आणि बेलापूर दरम्यान लोकल ट्रेन सेवा बंद करण्यात आल्या होत्या. ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान, सीएसएमटी ते वाशी (अप आणि डाउन), बेलापूर ते पनवेल (अप आणि डाउन), ठाणे ते नेरूळदरम्यान (अप आणि डाउन) लोकल सेवा सुरु होती.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, नवी मुबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका आणि बेस्ट यांनी बेलापूर ते वाशी स्थानकांदरम्यान विशेष गाड्यांची व्यवस्था केली. मिळालेल्या माहितीनुसार, सीवूड्स आणि नेरुळदरम्यान ट्रॅक रिलेइंग ट्रेन रुळावरून घसरल्याने हार्बर आणि ट्रान्स हार्बर लाईनवर परिणाम झाला.