मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर लोकल ट्रेनने बैलाला धडक दिली. या धडकेत बैलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.
या घटनेनंतर ठाण्याहून कल्याणकडे जाणाऱ्या सर्व जलद गाड्या डाऊन स्लो मार्गावर वळवण्यात आल्या. गाड्यांना उशीर झाल्याने चाकरमान्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बैलाचा मृतदेह रेल्वे रुळावरून काढून टाकण्यात आला आहे. लोकल सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कळव्याच्या पुढे जलद सेवा बंद करण्यात आली. पारसिक स्थानकाजवळ रेतीबंदर येथे तासभर ट्रेन थांबवण्यात आली, अशी माहिती आहे.
याबाबत एका प्रवाशाने एक्स हँटलवरून नाराजी व्यक्त केली. 'ठाणे आणि कल्याण दरम्यानचा जलद मार्ग कधी मोकळा होईल. मी अंबरनाथकडे प्रवास करता आहे. एका तासापेक्षा अधिक वेळ झाला मी कळवा आणि मुंब्रा स्थानकावर अडकलो आहे.'
दुसऱ्या प्रवाशाने आपल्या एक्स पोस्टवरून असे म्हटले आहे की, 'गेल्या ४० मिनिटांपासून ट्रेन जागेवर आहे. ठाणे येथून ९.५८ वा. अंबरनाथकडे जाणारी लोकल कळवा- मुंब्रा स्थानकादरम्यान अडकली आहे.'