मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबईकरांची लाइफलाइन समजल्या जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली. चर्चगेट आणि मरीन लाईन्स स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावरील सेवांवर परिणाम झाला. प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त करत सहकार्य करण्याची विनंती केली.
दुसरीकडे, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. दरम्यान, पालघरच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागात जोरदार वादळ आणि पावसाचा मोठा फटका बसला. मच्छिमारांवरही याचा परिणाम झाला आहे. डहाणू आणि पालघरमध्ये ४० ते ४५ बोटींचे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या बोटी वादळाच्या तडाख्यात सापडल्या आणि त्यांचे मोठे नुकसान झाले.जिल्हा प्रशासनाकडून या नुकसानीचा पंचनामा केला जात आहे.
हवामान विभागाने पुढील ४ ते ५ दिवसांसाठी हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. पुढील काही दिवस राज्यात तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला. राज्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला. तर, काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते.