Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 18:39 IST2025-11-06T18:39:33+5:302025-11-06T18:39:53+5:30
Mumbai Local Train Motorman Protest: मुंबई लोकल रेल्वे सेवा अचानक ठप्प झाल्याने गोंधळ उडाला. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर सीएसएमटीवरून सुटणाऱ्या गाड्या बंद झाल्या. त्यामुळे ठिकठिकाणी रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे.

Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
Mumbai Local Train News: मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात आंदोलन सुरू केल्याने लोकल रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांनी सायंकाळी साडेपाच वाजता आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे ५ वाजून ४० मिनिटांपासून रेल्वे सेवा बंद होती. तासभरातनंतर लोकल सेवा पुन्हा सुरू झाली.
ऐन गर्दीच्या वेळेत मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात आंदोलन सुरू केले. अचानक डाऊन दिशेने जाणाऱ्या सर्वच गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिननसमध्ये उभ्या असून, फलाटांवर प्रचंड गर्दी झाली होती. त्यानंतर ६.४५ वाजता रेल्वे सेवा सुरु करण्यात आली.
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर संध्याकाळी कर्मचाऱ्यांची निदर्शने सुरू असल्याने मोटरमन लोकलपर्यंत पोहचू शकले नाही. परिणामी ५:५० ते ६:४५ दरम्यान लोकल CSMT स्टेशनवर खोळंबल्या होत्या.
आंदोलनाचे कारण काय?
जून २०२५ मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ काही प्रवाशी लोकलमधून मृत्यूमुखी पडले होते. यात ४ जणांचा मृत्यू झाला होता, तर ९ जण जखमी झाले होते. या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी रेल्वे विभागातील दोन अभियंत्यांवर ठपका ठेवत गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झालेल्या रेल्वे अभियंत्यांवर कोणता आरोप?
मुंबईहून कर्जतकडे आणि कसाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या जलद लोकलच्या दरवाजात लटकून प्रवास करणाऱ्यांची एकमेकांना धडक बसली. त्यामुळे धावत्या लोकलमधून पडल्याने पाच प्रवाशांचा मृत्यू, तर नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले होते. या घटनेच्या चार महिन्यांनंतर मध्य रेल्वेच्या दोन विभागीय अभियंत्यांवर लोहमार्ग पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणा, ट्रॅक मेंटेनन्सकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका अभियंत्यांवर ठेवण्यात आला आहे.