Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 11:52 IST2025-05-17T11:51:36+5:302025-05-17T11:52:38+5:30
सीएसएमटी/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवल्या जातील. तर अप मेल/एक्स्प्रेस कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवल्या जातील.

Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
मुंबई :मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
यामध्ये मध्य रेल्वेच्या ठाणे - कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०:४० ते दुपारी ०३:४० पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी ९:३४ ते दुपारी ३:०३ पर्यंत सुटणाऱ्या अप आणि डाऊन जलद/सेमी-जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळवल्या जातील. या सेवा त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. तसेच सीएसएमटी/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवल्या जातील. तर अप मेल/एक्स्प्रेस कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवल्या जातील.
हार्बर मार्गावर वडाळा रोड - मानखुर्ददरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११ ते संध्याकाळी ४ पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार असून, या काळात यादरम्यानच्या फेऱ्या बंद राहतील. या काळात पनवेल-मानखुर्द-पनवेल मार्गावर विशेष लोकल चालवल्या जातील. या काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ४:३० पर्यंत ट्रान्स हार्बर लाइन व मुख्य मार्गिकेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
पश्चिम रेल्वेच्या वसई रोड आणि भाईंदर दरम्यानदेखील शनिवारी मध्य रात्री १२:३० ते रविवारी पहाटे ४:०० पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, या कालावधीत विरार/ वसई आणि बोरीवली/भाईंदर दरम्यान सर्व धिम्या लोकल जलद मार्गावर वळविण्यात येतील.