Mumbai Local: गर्दीच्या वेळी महिलांचा दरवाजात लटकून प्रवास, जागा मिळवण्यासाठी धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 17:29 IST2025-11-17T17:28:01+5:302025-11-17T17:29:50+5:30
Mumbai Local Train: मुंबई लोकलमधून प्रवास करताना महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

Mumbai Local: गर्दीच्या वेळी महिलांचा दरवाजात लटकून प्रवास, जागा मिळवण्यासाठी धक्काबुक्की
दीप्ती देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणारी सायंकाळची ६:२८ची कसारा फास्ट लोकल येण्याआधीच प्लॅटफॉर्म भरलेला. थोडेही सरकायला जागा नाही. त्यातच लोकल काही मिनिटे लेट... ‘आता आणखी गर्दी वाढणार, बसायला मिळेल की नाही? गर्दी झाली की ठाण्याशिवाय जागा मिळत नाही, नाहीतर थेट कल्याण...’ अशी चर्चा दररोज या लोकलने घरी जाणाऱ्या चार महिलांमध्ये सुरू होती.
लोकलमध्ये बसायला मिळावे, यासाठी महिला डबा जेथे येतो तेथेच प्लॅटफॉर्मवर पुरुष प्रवासी उभे राहतात. लोकल येताच, प्रवासी चालत्या गाडीतून उतरतात तर प्लॅटफॉर्मवरील पुरुष चालत्या गाडीत चढतात. त्यामुळे महिलांना धक्के खावे लागतात. कधी पुरुषांच्या हातातील बॅग जोरात लागते. मात्र, वाद घालायला वेळ आहे कुठे? कारण महिलाही तितक्याच वेगात चालत्या लोकलमधून डब्यात शिरतात सीट पटकावण्याचा पूर्ण प्रयत्न करतात.
ट्रेनमधून उतरणाऱ्या महिला स्वत:हून उतरल्या तर ठीक नाहीतर प्लॅटफॉर्मवरील महिला खेचून त्यांना बाहेर काढतात किंवा त्यांना जोरात धक्का देऊन पुन्हा डब्यात नेतात. सीटसाठी एकमेकांना धक्के देणे, पायावर पाय देऊन पुढे जाणे, हे नित्याचे आहे. या स्पर्धेत जेवणाच्या डब्याच्या बॅगा आणि पर्सही खाद्यांवरून उतरतात. विंडो सीट मिळाली म्हणजे दिवस सार्थकी लागला, असे वाटत असतानाच एखादी महिला नेमकी विंडोजवळ उभी राहून हवा अडविते.
जेथे महिला एकमेकींना खेटून उभ्या असतात, तेथे फेरीवालेही आपले कसब दाखवतात. जसजशी गाडी पुढच्या स्थानकावर सरकते तसतशी गर्दीही वाढत जाते. पुरुषांप्रमाणे दरवाजात लटकत प्रवास करण्यात महिलाही आघाडीवर आहेत. त्यात किती जणींचा जीव गेला, याची गणती नाही. गर्दीच्या वेळी जनरल डब्यात चढण्याची सोय नाही. ऑफिसमधून निघालेल्या महिलांना लोकलमध्ये चढण्यासाठी नव्या दमाने नवे युद्ध लढावे लागते.