मुंबई लोकलचे तिकीट आता लवकरच व्हॉट्सअॅपवरही काढता येणार, प्रवास अधिक सोपा होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 15:45 IST2025-08-01T15:44:34+5:302025-08-01T15:45:51+5:30
लोकलची तिकीट प्रणाली सोयीस्कर करण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू असून आता व्हॉट्सअॅप सारख्या चॅट आधारित अॅपद्वारे तिकीट काढण्याची प्रणाली सुरू करण्याचा विचार सुरू आहे.

मुंबई लोकलचे तिकीट आता लवकरच व्हॉट्सअॅपवरही काढता येणार, प्रवास अधिक सोपा होणार
महेश कोले
लोकलची तिकीट प्रणाली सोयीस्कर करण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू असून आता व्हॉट्सअॅप सारख्या चॅट आधारित अॅपद्वारे तिकीट काढण्याची प्रणाली सुरू करण्याचा विचार सुरू आहे. याबाबत इच्छुक संस्थांसोबत नुकतीच बैठक झाली. सर्व बाबींची पूर्तता झाल्यावर निविदा प्रक्रियेबद्दल विचार करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
डिजिटल इंडिया योजनेच्या अंतर्गत भारतीय रेल्वे तिकीट प्रणाली डिजिटल करण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. या माध्यमातून प्रवाशांना कॅशलेस आणि जलद तिकीट उपलब्ध करण्यात येत आहे.
डिजिटलकडे ओढा
सध्या २५ टक्के प्रवासी डिजिटल माध्यमांद्वारे तिकीट काढत असून त्याचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या सुरू असलेल्या डिजिटल तिकीट प्रणालीसोबतच तिकीट प्रणाली सोयीस्कर करण्यासाठी चॅट आधारित तिकीट प्रणाली विकसित करण्यावर रेल्वेचा भर आहे.
मेट्रोच्या प्रवाशांची पसंती
मेट्रोमध्ये तिकीट काढण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करण्यात येत आहे. तिकीट खिडकीवर असलेला क्युआर कोड स्कॅन केल्यावर चॅट उघडते. त्यावर हाय मेसेज पाठवल्यावर कुठले तिकीट काढायचे आहे त्याचे पर्याय दिले जात असून त्यानंतर पैसे भरल्यावर डिजिटल तिकीट उपलब्ध होते. मेट्रोचे ६७ टक्के तिकीट याच पद्धतीने काढले जात आहेत.
काय आहेत अडचणी?
व्हॉट्सअॅप तिकीट प्रणाली विकसित करताना अनेक बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. कारण सध्या यूटीएसच्या माध्यमातून क्युआर पद्धतीच्या तिकीट प्रणालीचा गैरवापर होत असल्याने अशा पळवाटा रोखता याव्यात यासाठी नवीन प्रणाली विकसित करताना काळजी घ्यावी लागणार आहे.
प्रवाशांच्या सोईस्कर होईल, अशी प्रणाली बनविण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी अनेक पर्यायांचा विचार सुरू असून चॅट बेस तिकीट प्रणाली हा त्याचाच एक भाग आहे.
- विनीत अभिषेक,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे