त्रिभाषा सुत्राचा जीआर राज्य सरकारनं मागे घेतल्यानंतर मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. हिंदीसक्तीचा निर्णय मागे घेतल्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आनंद व्यक्त करत असताना आता मुंबईची 'लाइफलाइन' असलेल्या लोकलमधील मराठीच्या जल्लोषाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.
हिंदीसक्तीच्या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारवर जोरदार टीका होत होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोखठोक भूमिका घेत सरकारनं जीआर मागे घेतला नाही तर ५ जुलै रोजी मोर्चाची घोषणा केली होती. याचवेळी उद्धव ठाकरे यांनीही ७ जुलै रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधुंनी एकत्र येत ५ जुलै रोजी एकत्रच मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. राज्यभरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून रविवारी हिंदीसक्तीच्या जीआरची होळी करण्यात आली.
राज्यभरातील वाढता विरोध लक्षात घेता सरकारनं निर्णय रद्द करत असल्याची घोषणा केली गेली. त्यानंतर मनसैनिक आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त केला गेला. ५ जुलैच्या मोर्चाही रद्द केला गेला. राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानाबाहेरही कार्यकर्त्यांनी ढोल वाजवत, फटाके फोडत आनंद साजरा केला. त्यानंतर आता मुंबईच्या लोकलमध्ये मराठी प्रवाशांकडूनही आनंद व्यक्त केला जात आहे. ज्यात "मराठी बोला, तुम्ही मराठी बोला, गर्वाने बोला आणि अभिमानाने बोला", असा जयघोष प्रवासी करताना दिसत आहेत.
पाहा लोकलमधील व्हायरल व्हिडिओ...
५ तारखेला होणार विजयी मेळावाहिंदीसक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर ५ जुलै रोजी होणारा मोर्चा रद्द होऊन त्याजागी विजयी मेळावा होणार असल्याचं उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरे यांनीही जाहीर केलं आहे. त्यामुळे येत्या ५ जुलै रोजी मुंबईत राज्यभरातून मराठी माणूस एकत्र जमलेला पाहायला मिळणार आहे. ज्यात मराठी भाषेचा जयजयकार केला जाईल, हा कोणताही राजकीय मेळावा नसेल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.