Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Local: शाब्दिक चकमक ते थेट हाणामाऱ्या; लोकल प्रवास ठरतोय जीवघेणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 15:24 IST

Mumbai Local Train Dispute: लोकलच्या अपुऱ्या फेऱ्या, वाढणारी गर्दी, त्यात ठरावीक वेळेत असलेली लोकल पकडण्याची घाई तसेच ट्रेनमध्ये उतरण्यासाठी आधीच दरवाजा अडवून उभे राहणारे प्रवासी, अशातच विविध कारणांमुळे होणारी शाब्दिक बाचाबाची थेट हाणामारीपर्यंत जाते.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: लोकलच्या अपुऱ्या फेऱ्या, वाढणारी गर्दी, त्यात ठरावीक वेळेत असलेली लोकल पकडण्याची घाई तसेच ट्रेनमध्ये उतरण्यासाठी आधीच दरवाजा अडवून उभे राहणारे प्रवासी, अशातच विविध कारणांमुळे होणारी शाब्दिक बाचाबाची थेट हाणामारीपर्यंत जाते. अनेकदा भांडणाच्या वेळी मध्यस्थी करणाऱ्यांचे, पोलिसांचेच डोके फोडण्यापर्यंत काहींची मजल गेल्याचे यापूर्वीच्या घटनांत घडले आहे. अलीकडेच मालाडच्या घटनेत गर्दीतील धक्का प्राध्यापक आलोक सिंह यांच्या जिवावर बेतला आहे. 

लोकलचा रोजचा प्रवास म्हणजे एखाद्या रणांगणावर जाण्यासारखेच आहे. तुडुंब गर्दीमुळे अनेकदा श्वास घेणेही अवघड होते. जागेअभावी अनेक जण दरवाजात लटकत, मृत्युशी डोळ्यांत डोळे घालून प्रवास करतात. काहीजण प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध दिशेने लोकल पकडतात, तर काही धावत्या ट्रेनकडे झेपावतात. त्यात अतिगर्दी हे लोकलमधील वादांचे मोठे कारण आहे. 

लोकलमध्ये रांगेत उभे राहून चढण्याचे आवाहन रेल्वे प्रशासन करत असले तरी गर्दीच्या वेळेत त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. प्रत्येक डब्यात पोलिस असतानाही अनेकदा, विशेषतः महिलांच्या भांडणांपुढे, ते हतबल झाल्याचे पाहायला मिळते. काही प्रसंगी तर पोलिसांवर हल्ले होऊन त्यांचे डोके फोडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मुंबई लोकलमधील वाढते वाद हे केवळ प्रवाशांचे नव्हे, तर संपूर्ण व्यवस्थेचे अपयश दर्शवतात. त्यासाठी शिस्त, संयम, प्रशासनाकडून  प्रभावी उपाययोजना होणे आवश्यक आहे.

यापूर्वीच्या घटना

१८ डिसेंबर २०२५: पनवेल-खांदेश्वर स्थानकांदरम्यान महिलांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्या ५० वर्षीय मनोरुग्ण व्यक्तीने हटकल्याचा रागातून १८ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीला धावत्या लोकलमधून बाहेर ढकलले होते. या घटनेतील विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, रेल्वे पोलिसांनी आरोपी शेख अख्तर नवाज याला तत्काळ ताब्यात घेतले.

२० मे २०२५: सीएसएमटी ते अंबरनाथ लोकलमध्ये पुरुषाने महिलेस मारहाण केली.

२० जून २०२५: चर्चगेट ते विरारदरम्यान लोकलमध्ये दरवाजात उभे राहण्यावरून महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला.

६ ऑक्टोबर २०२२: ठाणे-पनवेल लोकलमध्ये झालेल्या हाणामारीत वाद सोडवण्यासाठी गेलेल्या महिला पोलिसाचे डोके फोडल्याची घटना घडली.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Local: From Verbal Spat to Assault; a Deadly Commute

Web Summary : Mumbai local trains see frequent fights due to overcrowding and rush. Arguments escalate to violence, sometimes injuring even intervening police. Lack of discipline and effective management worsen the situation, making daily commute dangerous.
टॅग्स :मुंबई लोकलमुंबईगुन्हेगारी