Join us

मुंबईला पावसाने झोडपले, उपनगरवासीय बेहाल; पावसाची दमदार खेळी; रस्ते वाहतूक मंदावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 09:18 IST

Mumbai Heavy Rain: जुलैच्या सुरुवातीला मुंबईकरांना मोठ्या पावसाची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र पावसाने उसंत घेतली होती. परंतु सोमवारपासून त्याने पुन्हा बऱ्यापैकी जोर पकडला. सोमवारी रात्री पावसाने अनेक ठिकाणी जोरदार खेळी केली. 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत ठिकठिकाणी पडलेल्या पावसाने मुंबापुरीचा चक्का जाम केला. शहराच्या तुलनेत पूर्व उपनगरात सायन, कुर्ला, घाटकोपर, विद्याविहार, विक्रोळी, पवई, साकीनाका, वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी, गोरेगाव, कांदिवली आणि बोरिवली पट्ट्यात पावसाने नागरिकांचे सकाळीच हाल केले. दुपारी १ नंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. मुंबईमध्ये मंगळवारी दिवसभरात एकूण ५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

जुलैच्या सुरुवातीला मुंबईकरांना मोठ्या पावसाची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र पावसाने उसंत घेतली होती. परंतु सोमवारपासून त्याने पुन्हा बऱ्यापैकी जोर पकडला. सोमवारी रात्री पावसाने अनेक ठिकाणी जोरदार खेळी केली. 

मंगळवारी सकाळी मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचे आकाश काळवंडले होते आणि अवकाश अंधारून गेला होता. सकाळी ९ वाजल्यापासून दक्षिण मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली. उपनगरात कुर्ला, वांद्रे, सायन परिसरात १० वाजल्यापासून १ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळला. 

पावसामुळे रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला होता. पूर्व उपनगरात ठाणे आणि मुंबईला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावर कल्पना थिएटर आणि शीतल सिग्नलवर गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे त्या भागातील वाहतूक कासवगतीने सुरू होती. साकीनाका, अंधेरी, सांताक्रुझ, वांद्रे आणि सायन या पट्ट्यातही सकाळी वाहतुकीची रखडपट्टी झाली. विस्कळीत झालेली मुंबईची वाहतून दुपारनंतर पूर्वपदावर आली. 

टॅग्स :पाऊस