मुंबईतील कुर्ला येथील भाभा रुग्णालयात औषधांचा साठा संपला आहे तसेच महत्त्वाच्या उपकरणांमध्येही बिघाड झाल्याची माहिती समोर आली. त्याचा रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. रुग्णांना बाहेरून आवश्यक औषधे खरेदी करावी लागत आहे. शिवाय, निदान चाचण्यांसाठी खाजगी प्रयोगशाळांमध्ये जावे लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले लोक भाभा रुग्णालयात उपचार घेतात. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांवर स्व:खर्चाने औषध खरेदी करण्याची वेळ आली आहे.
भाभा रुग्णालय हे ३३६ खाटांचे रुग्णालय असूनही, त्यापैकी फक्त २७० खाटा कार्यरत आहेत. क्षमता असूनही रुग्णालयाला सेवांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. कुर्ला, नेहरू नगर, चुनाभट्टी, चेंबूर, टिळक नगर आणि घाटकोपर येथील नागरिक भाभा रुग्णालयात उपचार घेतात, जे जे पूर्णपणे महानगरपालिकेच्या आरोग्यसेवेवर अवलंबून असतात. दररोज सुमारे १,७०० ते २००० रुग्ण रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये येतात.
औषधाच्या कमतरतेव्यतिरिक्त रुग्णालय कर्मचाऱ्यांची कमतरता आणि प्रमुख निदान उपकरणांमध्ये वारंवार बिघाड, यांसारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कार्यरत नसलेल्या यंत्रांमुळे किंवा दुरुस्तीमध्ये विलंब झाल्यामुळे रुग्णांना अनेकदा वैद्यकीय चाचण्यांसाठी दुसरीकडे पाठवले जात आहे.
बीएमसीच्या रुग्णालयांपैकी एक म्हणून भाभा हे स्थानिक आरोग्यसेवेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी तातडीने पावले उचलली जात नाहीत, तोपर्यंत रुग्णांना अशाप्रकारच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल, यात काही शंका नाही.