मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 07:13 IST2025-11-04T07:12:52+5:302025-11-04T07:13:25+5:30
कलाकारांनाही समन्स बजावत हजर राहण्यास सांगितले आहे

मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गुन्हे शाखेने पवई ओलिस नाट्य प्रकरणात रोहित आर्याचा एन्काउंटर करणारे सहायक पोलिस निरीक्षक अमोल वाघमारे, पवई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सोनावणे आणि स्टुडिओ मालक मनीष अग्रवाल यांचा जबाब नोंदवला आहे. घटनेदरम्यान रोहित आर्याला समजावणारे अधिकारी, स्टुडिओला भेट दिलेल्या कलाकारांसह तत्कालीन शिक्षणमंत्रीमंत्री दीपक केसरकर यांची चौकशी करून जबाब नोंदविण्यात येणार आहे. कलाकारांना समन्स बजावत हजर राहण्यास सांगितले आहे.
प्राथमिक तपासात गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, घटनेदरम्यान मुलांची सुटका करण्यासाठी उपआयुक्त दत्ता नलावडे आणि वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी आर्याशी वाटाघाटी केल्या. त्यावेळी आर्याने केसरकर यांच्याशी बोलण्याची मागणी केली होती. पोलिसांनी त्यांना फोन केल्याचे समजते. मात्र फोन लागला नाही की केसरकर यांनी आर्याशी बोलण्यास नकार दिला या दोन वेगवेगळ्या माहितीमुळे गुन्हे शाखेचा संभ्रम वाढला आहे. यात नेमके काय घडले? याचा सविस्तर तपास गुन्हे शाखा करत आहे. त्यासाठी वाटाघाटीत सहभागी अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली आहे, असे गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. आतापर्यंत पवई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक अमोल वाघमारे आणि स्टुडिओ मालकाचा जबाब नोंदविण्यात आला आहे.
मानसिक रुग्ण असल्याचे पुरावे नाही
गुन्हे शाखेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आर्याची वैद्यकीय पार्श्वभूमी आणि मानसिक स्वास्थ्य तपासले जात आहे. मात्र, तो मानसिक रुग्ण होता, असे पुरावे मिळालेले नाहीत. त्याच्या आर्थिक बाजूचीही पडताळणी सुरू आहे.