मुंबईत विजेचा शॉक लागून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 08:58 IST2019-06-11T08:57:22+5:302019-06-11T08:58:17+5:30
मुंबईत पावसाच्या भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडलेल्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत विजेचा शॉक लागून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मुंबईः मुंबईत पावसाच्या भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडलेल्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. कांदिवली पूर्वेकडच्या पोईसर या भागात ही दुर्घटना घडली आहे. तुषार झा आणि ऋषभ तिवारी ही मुलं काल रात्री पाऊस पडत असल्यानं भिजण्यासाठी घराच्या बाहेर पडली. ही मुलं चाळीत राहत असल्यानं पावसात तिथे पाणी तुंबलं होतं. पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या या लहानग्यांना अचानक शॉक लागला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
एकूण तीन मुलं होती, त्यातील एका मुलाला स्वतःचा जीव वाचवण्यात यश आलं. त्यातच एक वायर तुटल्यानं ती चाळीतल्याच एका लोखंडी शिडीला चिकटली आणि या मुलांचा त्या शिडीतून आलेला शॉक लागून मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात नागरिक पालिका प्रशासनाविरोधात नागरिक झाले आहेत. जवळच्याच मैदानात काम केल्यापासून पावसाचं पाणी आमच्या घरात येत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
एका स्थानिकानं सांगितलं की, आम्ही मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु आमच्या घरातही करंट पास झाला होता. पोलीस आले, तोपर्यंत त्या मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. कारण पोईसरमधल्या जनतानगरमध्ये चाळ सिस्टीम असल्यानं बहुतेकांच्या घराला अशा प्रकारची शिडी आहे.