महामुंबई तापाने फणफणली! खोकून खोकून घसा लाल, ताप-सर्दीची लागण झपाट्याने वाढतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 06:05 IST2025-07-09T06:04:43+5:302025-07-09T06:05:20+5:30

हॉस्पिटल्समध्ये प्रचंड गर्दी, मुंबईतील मोठमोठ्या रुग्णालयांपासून ते स्थानिक दवाखान्यांपर्यंत सगळीकडे ताप, खोकला आणि सर्दीने त्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. 

Mumbai is in a fever! Coughing, throat red, fever and cold infections are increasing rapidly | महामुंबई तापाने फणफणली! खोकून खोकून घसा लाल, ताप-सर्दीची लागण झपाट्याने वाढतेय

महामुंबई तापाने फणफणली! खोकून खोकून घसा लाल, ताप-सर्दीची लागण झपाट्याने वाढतेय

मुंबई - मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात सर्वत्र ‘व्हायरल इन्फेक्शन’ने डोके वर काढले असून सर्दी, ताप, घशात खवखव व  खोकल्याच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. हवामानातील बदल, पावसाळ्याची सुरुवात आणि प्रदूषण यामुळे संसर्गजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे.

अख्या मुंबई-ठाण्यात जागोजागी कचऱ्याचे ढीग पसरलेले असून ते वेळेत उचलले जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी जंतुनाशकाची फवारणी देखील बंद झाली आहे.  महा मुंबईच्या प्रत्येक रुग्णालयात ३० ते ४० टक्के रुग्ण याच लक्षणाचे येत आहेत. व्हायरल इन्फेक्शनची सुरुवात सर्दी, शिंका, ताप आणि घशातील खवखव या लक्षणांपासून होते. मात्र योग्य उपचार न केल्यास किंवा वेळेत डॉक्टरांचा सल्ला न घेतल्यास पुढे जाऊन गुंतागुंत निर्माण होऊन ब्रॉन्कायटिस, न्यूमोनिया, अथवा घशात जळजळ व सूज अशा गंभीर आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

काही रुग्णांना डोकेदुखी, अंगदुखी व सततचा थकवा देखील जाणवत आहे.  मुंबईतील मोठमोठ्या रुग्णालयांपासून ते स्थानिक दवाखान्यांपर्यंत सगळीकडे ताप, खोकला आणि सर्दीने त्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. 

बालकांसह ज्येष्ठ नागरिकांना अधिक धोका
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आणि आधीपासूनच अस्थमा, सायनस अथवा हृदयविकाराशी झुंजणारे रुग्ण यांना या हवामान बदलाच्या काळात धोका अधिक असतो. त्यांच्या रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

सावधगिरी हाच उपाय
गरज नसताना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, मास्क वापरा, हात स्वच्छ धुवा, आणि पुरेशी झोप व पोषक आहार घ्या, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे. या आजराची लक्षणे दिसताच विशेष करून ज्यांना सहव्याधी आहेत त्यांनी घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले.

सध्या वातावरणातील बदल आणि आर्द्रता यामुळे व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण वाढत आहे. सर्दी-तापाला सामान्य समजून दुर्लक्ष करू नका. विशेषतः खोकला सातत्याने होत असेल, तर तो फुफ्फुसांवर परिणाम करणारा असू शकतो. सध्या बाह्य रुग्ण विभागात अशा लक्षणांचे रुग्ण अधिक प्रमाणात दिसून येत आहे.
डॉ. विनायक सावर्डेकर, अधीक्षक, सेंट जाॅर्जेस रुग्णालय

गेल्या काही दिवसांपासून व्हायरल संसर्गाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसाला ओपीडीमध्ये किमान ५० रुग्ण सर्दी खोकला ताप या लक्षणांची येत आहेत. आपल्याकडे ट्रेन, बसमध्ये मोठी प्रमाणात गर्दी असते. या अशावेळी हा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरतो. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेचे सर्वसाधारण नियम पाळले पाहिजे. या आजारात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे प्रोटीनयुक्त आहार आणि शरीर डीहायड्रेट होणार नाही याची काळजी घेऊन पाणी मुबलक प्रमाणात प्यावे. - डॉ किशोर साठे, कन्सल्टंट, इमर्जिंसी मेडिसिन, हिंदुजा हॉस्पिटल, माहीम

Web Title: Mumbai is in a fever! Coughing, throat red, fever and cold infections are increasing rapidly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.