Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई तापतेय; मार्चमध्ये पारा ४० वर, उकाडा असह्य, एप्रिल-मे महिन्यात आणखी तीव्र उष्णतेचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:26 IST

हवामान विभाग कधी करतो 'उष्मालाट' जाहीर ?

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ग्लोबल वॉर्मिंग आणि स्थानिक घडामोडींमुळे हवामानात बदल होत असून, मुंबईच्या कमाल तापमानात गेल्या दहा वर्षात वाढ झाली आहे. दहा वर्षांपूर्वी मुंबईचे कमाल तापमान फार फार तर ३५ च्या आसपास नोंदविले जात होते. मात्र, यंदाचा उन्हाळा पाहता यावर्षी तर मार्च महिन्यात दोन उष्णतेच्या लाटा आल्या असून, तापमानाचा पारा ४० वर पोहोचला आहे. ही वाढ सरासरीच्या तुलनेत ५ डिग्रीने अधिक आहे.

वृक्षतोड, काँक्रीटचे रस्ते आणि प्रदूषण असे अनेक घटक मुंबईमधील हवामान बदलास कारणीभूत असून, यावर नियंत्रण मिळविले आवश्यक आहे.

उपाययोजना काय आहेत ?

शहरी व्यवस्थेत बदल करावा. वृक्ष लागवड करावी. वाहने सोलर आणि बॅटरीवर चालवावी. उद्योग, वाहनांचे प्रदूषण शून्य करावे.

महापालिकेचे कृती अहवाल कार्यान्वित करावे, पेट्रोल, डिझेल वाहनांवर बंदी, रस्ते-फ्लॅटवर वृक्ष लागवड, उद्योगाचे प्रदूषण थांबविणे, घरचे-हॉटेल्सचे प्रदूषण कमी करावे, वाहने केवळ सोलार बॅटरीवर असावीत.

कमाल आणि किमान तापमानात किती वाढ?

मार्च ते मे दरम्यान सरासरी किमान २१ ते २७ इतके, तर कमाल ३३ ते ३५ डिग्री तापमान होते. परंतु, अलीकडे कमाल तापमान ३७.१ ते ४०.६ डिग्रीपर्यंत वाढले आहे. थंडीचे तापमान १० ते १६ झाले आहे. पावसाळ्यातसुद्धा ३५ डिग्री असते. समुद्राचे तापमान २५ चे वाढून ३० पर्यंत वाढले आहे.

जागतिक तापमान वाढ, समुद्र तापमान वाढ, तसेच शहरीकरण, प्रदूषण, वृक्षतोड, औद्योगिकरण, वाढती वाहने उष्मा वाढवतात.

वातावरण आणि हवामान यात फरक काय?

ग्लोबल वॉर्मिंग ही जागतिक तापमान वाढ आहे. वातावरण हे पृथ्वीचे असते, तर हवामान हे ग्लोबल आणि स्थानिक परिसरातील असते हा फरक आहे.

अलीकडे समुद्राचे तापमान २५ वरून आता ते ३० डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. मुंबईचे तापमान वाढले तर मोठे बाष्पीकरण होते. पाऊस वाढतो. जगात समुद्राजवळ तापमान आणि हवामान थोड्या फरकाचे असते. परंतु, एकाच बाजूने समुद्र असेल तर आतील भागात तापमान जास्त असते. समुद्राचे वाढते तापमान हे हवामान, तापमान बदल करत असते. - प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी

हवामान विभाग कधी करतो 'उष्मालाट' जाहीर ?

भारतात हवामान खाते व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निकषानुसार मैदानी भागात ४० डिग्री अंश सेल्सीअस, डोंगराळ भागात ३० डिग्री अंश सेल्सिअसपेक्षा व समुद्र किनारी भागात ३७ अंश डिग्रीपेक्षा जास्त तापमान जात असल्यास त्यास उष्मालाट प्रवणक्षेत्र मानले जाते. तापमानात झालेली वाढ ही हवामान खात्याच्या २ उपविभागांमध्ये सलग दोन दिवस ४.५ डिग्रीपेक्षा जास्त नोंदविल्यास दुसऱ्या दिवशी उष्मालाट जाहीर केली जाते.

उष्मालाटेची अद्याप जागतिक स्तरावर नेमकी अशी व्याख्या केली नसली तरी, सर्वसाधारणपणे एखाद्या भागात / क्षेत्रात उच्च तापमानामध्ये अचानक ४.५ अंश सेल्सिअसपेक्षा वाढ होणे यास उष्मालाट म्हणतात व ६.४ अंश सेल्सिअसपेक्षा तापमानात जास्त वाढ झाल्यास त्यास तीव्र उष्णतेची लाट म्हणतात. दरम्यान, जागतिक स्तरावर युरोप, आशिया, अमेरिका, आफ्रिका या ठिकाणी वेगवेगळे निकष आहेत. कारण त्या त्या भागातील सर्वसाधारण हवामानाची स्थिती ही वेगवेगळी असते.

...तर उष्माघात प्राणघातक

उष्मा-लहर ही वातावरणीय तापमानाची स्थिती आहे. ज्यामुळे शारीरिक ताण येतो. त्याचा कधी कधी मानवी जीवनावर अतिशय विपरीत परिणाम होतो. कमाल तापमान सलग दोन दिवस ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहिल्यास त्याला उष्मा लहरी स्थिती म्हणतात.

उष्माघात ही वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे. जी शरीराच्या तापमानाचे नियंत्रण यंत्रणा असफल झाल्याने होते. प्रखर उष्णतेमुळे शरीराचे तापमान ४० किंवा त्याहून अधिक होते, ज्यामुळे विविध अवयवांवर विपरीत परिणाम होतो. योग्य वेळी उपचार न केल्यास उष्माघात प्राणघातक ठरू शकतो.

उष्माघाताचा धोका कोणत्या गटांसाठी अधिक असतो ?

वयोवृद्ध आणि लहान मुले, हृदयविकार, उच्च रक्तदाब असलेले रुग्ण, मधुमेह, लठ्ठपणा असलेले लोक, बाहेर उन्हात काम करणारे मजूर आणि शेतकरी, खेळाडू आणि सैन्यातील जवान. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Sizzles: Mercury Hits 40°C, Heatwave Intensifies, More Expected

Web Summary : Mumbai grapples with soaring temperatures, reaching 40°C in March, driven by global warming and local factors like deforestation and pollution. Experts warn of a hotter April-May, urging measures like increased tree planting and pollution control to mitigate the impact.
टॅग्स :उष्माघातमुंबई