Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई : पत्नीचे हात-पाय बांधून पतीनं चिरला तिचा गळा, भांडुपमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 14:40 IST

मुंबईतील भांडुप परिसरात अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे.

मुंबई - मुंबईतील भांडुप परिसरात अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत पतीनं पत्नीचे हात-पाय बांधून चाकूनं तिचा गळा चिरुन निर्घृण हत्या केलीय. भांडुपच्या तुलेशत पाडा येथील ही खळबळजनक घटना आहे. 

भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीनिवास पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा गुप्ता असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. आरोपी पतीचे नाव बिरबल असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.  नेहा आणि बिरबलमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. त्यांना तीन मुली असून एक साडेपाच वर्षे, दुसरी दीड वर्षे आणि तिसरी अवघ्या दीड महिन्यांची मुलगी आहे. कौटुंबिक वादामुळे दोघांमध्ये नेहमी भांडणे व्हायची. गुरुवारी (3 मे) बहिणीच्या लग्नाला जाण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. मात्र या वादाचं पर्यवसान हत्येमध्ये झालं. बिरबलनं सुरुवातीला नेहाचे हात पाय बांधले आणि स्वयंपाक घरातील भाजी चिरण्याच्या चाकूनं तिचा गळा चिरला. 

यानंतर त्यानं चोरांनी पत्नीची हत्या केल्याचा बनाव केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाची चक्र फिरवली. चौकशीदरम्यानच पोलिसांना बिरबलनंच पत्नी नेहाची हत्या केल्याचा संशय आला होता. मात्र सुरुवातीला त्यानं गुन्हा कबुल केला नाही. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच बिरबलनं अखेर गुन्ह्याची कबुली दिली.    

 

टॅग्स :खूनमृत्यू