Join us  

Mumbai Hospital Fire : गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 2:35 PM

अंधेरी पूर्व येथील कामगार हॉस्पिटलमध्ये सोमवारी (17 डिसेंबर) घडलेल्या आग दुर्घटनेप्रकरणानंतर मंगळवारी (18 डिसेंबर) दुपारी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी हॉस्पिटलला भेट दिली.

मनोहर कुंभेजकर

मुंबई - अंधेरी पूर्व येथील कामगार हॉस्पिटलमध्ये सोमवारी (17 डिसेंबर) घडलेल्या आग दुर्घटनेप्रकरणानंतर मंगळवारी (18 डिसेंबर) दुपारी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आगीत 9 जणांचा मृत्यू झाला तर 154 जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी  रणजित पाटील आले असता 500 कर्मचारी आणि येथील उपस्थित नागरिकांना त्याचा सामना करावा लागला. पाहणीनंतर हॉस्पिटलमधून बाहेर पडताना कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी रणजित पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. पाटील यांना योवेळी प्रचंड प्रमाणात नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

दरम्यान आज संध्याकाळी केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री(स्वतंत्र कारभार)संतोष गंगवाल, या खात्याचे केंद्रीय सचिव व इएसआयएसचे डायरेक्टर जनरल हे मुंबईत येत असून या हॉस्पिटलला भेट देणार आहेत.

 

यावेळी कामगारांनी नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉरपरेशन(एनबीसीसी) विरोधातदेखील जोरदार घोषणाबाजी केली. गेली 10 वर्षे येथे एनबीसीसीच्या माध्यमातून नव्या इमारतीचे काम संथगतीने सुरू आहे. मात्र यावर केंद्र आणि राज्य सरकार दोघांचीह लक्ष नसल्याचा आरोप येथील कर्मचाऱ्यांनी केला आहे. या हॉस्पिटलचे फायर ऑडिट गेली अनेक वर्षे झाले नसून यामध्ये अनेक त्रुटी आहेत. याकडे देखील कामगारांनी लक्ष वेधले.  

 

टॅग्स :अंधेरी कामगार रुग्णालयाला आगआंदोलनआग