Mumbai Crime: क्षुल्लक कारणावरून रागाचा पारा चढल्याने एका सुशिक्षित पतीने आपल्या २० वर्षीय पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील गोवंडी परिसरात घडली. बिर्याणीत मीठ जास्त झाले या कारणावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीचे डोकं भिंतीवर आदळले, ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपी मंजर इमाम हुसेन (२३) हा एका खासगी कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करतो. त्याचा विवाह ऑक्टोबर २०२३ मध्ये नाझिया परवीन (२०) हिच्याशी झाला होता. दोघेही एकमेकांचे नातेवाईक होते आणि प्रेमविवाहानंतर गोवंडीत राहत होते. १९ डिसेंबर रोजी रात्री नाझियाने जेवणात बिर्याणी बनवली होती. मात्र, बिर्याणीत मीठ जास्त झाल्याच्या कारणावरून मध्यरात्री १ ते १:३० च्या सुमारास दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात मंजरने नाझियाचे डोकं जोरात भिंतीवर आदळले. यात गंभीर दुखापत झाल्याने नाझियाचा जागीच मृत्यू झाला.
घरगुती हिंसाचाराची होती पार्श्वभूमी
नाझियाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर काही काळातच त्यांच्यात वाद सुरू झाले होते. मंजर हा इतर महिलांशी संपर्कात असल्याचा संशय नाझियाला होता, त्यावरून विचारणा केली असता तो तिला मारहाण करत असे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अशाच एका भांडणात नाझियाचा दातही पडला होता. नातेवाईकांनी त्यांना पोलीस तक्रार करण्याऐवजी समजुतीने घेण्याचा सल्ला दिला होता, मात्र हाच सल्ला नाझियाच्या जीवावर बेतला.
नातेवाईकांचा आक्रोश
नाझिया मूळची उत्तर प्रदेशातील कुशीनगरची होती. तिचे वडील सौदी अरेबियात नोकरीला असून ती घरातील मोठी मुलगी होती. गुरुवारी रात्री ८ वाजता तिचे धाकट्या बहिणीशी शेवटचे बोलणे झाले होते, तेव्हा तिने आपण जेवण बनवत असल्याचे सांगितले होते. मात्र, सकाळी शेजाऱ्यांनी तिचा मृतदेह पाहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
पोलिसांची कारवाई
राजावाडी रुग्णालयात करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात नाझियाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पुराव्यांच्या आधारे शिवाजी नगर पोलिसांनी रविवारी आरोपी पती मंजर इमाम हुसेन याला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.