Join us

मुंबई पुन्हा तापली! पारा 37.5 अंशांवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 00:56 IST

कमी झालेली आर्द्रता, समुद्राहून जमिनीकडे वाहणारे उष्ण वारे स्थिर होण्यास होणारा विलंब या कारणांमुळे कमाल तापमान वाढत असून, सोमवारी मुंबईचे कमाल तापमान ३७.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.

मुंबई : कमी झालेली आर्द्रता, समुद्राहून जमिनीकडे वाहणारे उष्ण वारे स्थिर होण्यास होणारा विलंब या कारणांमुळे कमाल तापमान वाढत असून, सोमवारी मुंबईचे कमाल तापमान ३७.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. शुक्रवारसह शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३७ अंश नोंदविण्यात आले होते. रविवारी यात दोन अंशांची घट नोंदविण्यात आली होती. मात्र सोमवारी पुन्हा मुंबईच्या कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात आली.

समुद्रात वादळी वारे घोंगावत असले की येथे गारवा निर्माण होतो. मात्र एकदा का वादळी वाऱ्याने दिशा बदलली अथवा ते विरले की आर्द्रता कमी होते. आर्द्रता कमी झाली की तापमान वाढते. तापमान वाढले की साहजिकच त्याची झळ लगतच्या परिसराला बसते. नुकतेच अरबी समुद्रात ‘लुबान’ नावाचे चक्रिवादळ येऊन गेले. त्याचा प्रभाव आता ओसरला असला तरी चक्रिवादळानंतर वातावरणात झालेल्या बदलामुळे कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असून, याचा फटका मुंबईकरांना बसत आहे. मान्सूननेही काढता पाय घेतल्याने आॅक्टोबर हीटचा तडाखा वाढत असून, राज्यातील शहरांचे सरासरी कमाल तापमान ३६ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, मागील २४ तासांत कोकण, गोव्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. १६ ते १९ आॅक्टोबरदरम्यान कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

मंगळवारसह बुधवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३७, २५ अंशांच्या आसपास राहील.

कमाल तापमानात झाली वाढनुकतेच अरबी समुद्रात ‘लुबान’ नावाचे चक्रिवादळ येऊन गेले. त्याचा प्रभाव आता ओसरला असला तरी चक्रिवादळानंतर वातावरणात झालेल्या बदलामुळे कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असून, याचा फटका मुंबईकरांना बसत आहे. त्यामुळे मुंबईकरांचा घाम निघत आहे.

टॅग्स :उष्माघातमुंबई