मुंबई : आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात एकीकडे घरांच्या विक्रीने उच्चांकी आकडा गाठला असतानाच मुंबई शहरात भाड्याच्या दरानेही नवा उच्चांक नोंदवला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत मुंबईतील भाड्याच्या दरात सरासरी १० टक्के वाढ झाली असल्याची माहिती बांधकाम क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे.
या सर्वेक्षणानुसार, मुंबईतील भाड्याचा प्रति महिना प्रति चौरस फूट दर ८६ रुपये ५० पैसे इतका वाढला आहे. यानंतर दुसरा क्रमांक दिल्लीचा असून, दिल्लीतील भाड्याचे प्रति महिना प्रति चौरस फूट दर ३७ रुपये ५५ पैसे इतके आहेत. तर, तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई आहे. तेथील प्रति महिना प्रति चौरस फूट दर ३३ रुपये ८३ पैसे इतके आहेत.
ज्यांनी घरे भाड्याने घेतली आहेत त्यातील बहुतांश लोक हे ३० ते ४५ या वयोगटातील आहेत. फिरतीची नोकरी किंवा बदलीची नोकरी यामुळे लोक भाड्याने घर घेत आहेत.
सुविधा प्रकल्पांमुळे वाढ
- मुंबईच्या पश्चिम उपनगरात पायाभूत सुविधांचे प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे तेथील इमारतींमधील भाड्याचे दरदेखील वाढले आहेत.
- मुंबईच्या उपनगरांमध्ये इमारतींच्या पुनर्विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळे भाड्याचे दर वाढल्याचे निरीक्षण या सर्वेक्षणात नोंदवण्यात आले आहे.