माहीम ते वांद्रे आणि सायन ते कुर्ला या दोन रस्त्यांमुळे वाढली मुंबई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 10:14 IST2024-01-01T10:01:51+5:302024-01-01T10:14:05+5:30
सात बेटं एकत्र करूनही मुंबईचं क्षेत्रफळ होतं जेमतेम ६७ ते ६८ किलोमीटर. पण पुढे दोन पूल (कॉजवे) बांधताच हे क्षेत्रफळ झालं तब्बल ६०३ किलोमीटर.

माहीम ते वांद्रे आणि सायन ते कुर्ला या दोन रस्त्यांमुळे वाढली मुंबई!
संजीव साबडे,मुक्त पत्रकार:
माहीम ते वांद्रे व सायन ते कुर्ला या रस्त्यांमुळे पूर्व व पश्चिम उपनगरांत आणि त्या पलीकडे राहणाऱ्या लाखो लोकांना मुंबईच्या शहर भागात रोजगार मिळाला आणि आजही मिळत आहे.
सात बेटं एकत्र करूनही मुंबईचं क्षेत्रफळ होतं जेमतेम ६७ ते ६८ किलोमीटर. पण पुढे दोन पूल (कॉजवे) बांधताच हे क्षेत्रफळ झालं तब्बल ६०३ किलोमीटर. हे झालं ब्रिटिशांच्या काळात. मूळ मुंबई होती माहीम व शीव-सायनपर्यंत. पुढे आजची सारी उपनगरं म्हणजे पूर्वीचं साष्टी वा सालसेट बेट. या बेटांवरही खूप लोक राहत. त्यांना मुंबईत व मुंबईकरांना उपनगरात बोटीने ये-जा करावी लागे. त्यामुळे माहीम ते वांद्रे व सायन ते कुर्ला यामधील खाडीवर मार्ग बांधणं आवश्यक होता. खाडी, समुद्र वा कोणत्याही ओलसर ठिकाणी उभारलेल्या मार्गाला कॉजवे म्हणतात. त्याप्रमाणे सायन ते कुर्ला हा आधी व नंतर माहीम ते कुर्ला कॉजवे बांधण्यात आले. त्यांच्यामुळे मुंबईची भरभराट झाली. व्यापार, उद्योग वाढला, मुंबई भराभर वाढत गेली.
माहीमहून वांद्र्यात येण्यासाठीचा रस्ता म्हणजे माहीम कॉजवे. त्याच्या दोन्ही बाजूला समुद्र-खाडी आजही दिसते. अगदी रेल्वेने जातानाही. या कॉजवेच्या बांधकामाचा खर्च लेडी जमशेदजी यांनी केला. हा निधी देताना त्यांनी ब्रिटिशांना एकच अट घातली आणि ती म्हणजे या मार्गाच्या वापरासाठी टोल आकारण्यात येऊ नये. ती सरकारने मान्य केली. कॉजवेसाठी तेव्हा खर्च आला होता १ लाख ५७ हजार रुपये. या मार्गाचं काम १८४१ मध्ये सुरू होऊन १८४६ साली पूर्ण झालं. दानशूर उद्योगपती जमशेदजी जीजीभाई यांच्या त्या पत्नी.
माहीम सिग्नलपाशी एक छोटं कार्यालय होतं. त्यावर जकात कार्यालय (कस्टम हाऊस) असा बोर्ड होता. कॉजवेला टोल नसला तरी जकात होती. आता तिथं लाकूड व बांबूच्या वखारीच दिसतात.
शीव-सायन ते कुर्ला कॉजवे १७९८ ते १८०५ या काळात बांधला. त्यासाठी ५० हजार ३७० रुपये खर्च आला होता. पुढे त्याची रुंदी वाढवण्यावर ४० हजार रुपये खर्च झाले. या कॉजवेच्या बांधकामाचा खर्च सरकारने केला होता. त्यामुळे तिथं टोल लावला. चार चाकी घोडागाडीसाठी ८ आणे आणि अन्य वाहनांना त्याहून कमी. या टोलमधून दरवर्षी २७ हजार रुपये मिळू लागले. टोल सुरू करताच जकात वसुली रद्द केली. कॉजवेजवळची धारावीची खाडी झोपडपट्टी व अन्य बांधकामामुळे दिसेनाशी झाली आहे.