समुद्राचे नैसर्गिक रक्षणकर्ते आता विसावणार उद्यानात !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 05:32 IST2026-03-30T05:32:15+5:302026-03-30T05:32:57+5:30
राज्य शासनाच्या वन विभागाने गोराई जेट्टी परिसरात कांदळवन उद्यान विकसित केले आहे.

समुद्राचे नैसर्गिक रक्षणकर्ते आता विसावणार उद्यानात !
सुजित महामुलकर
विशेष प्रतिनिधी
आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबई शहरात सुमारे ६६ चौ. कि.मी. क्षेत्रावर विस्तृत कांदळवन (खारफुटी-मॅग्रोव्ह) वनस्पती आढळते. किनारपट्टी, खाड्या आणि नदीमुखांलगत पसरलेल्या या कांदळवनांपैकी विक्रोळी, ठाणे खाडी, गोराई आणि वर्सोवा येथे मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र आहे. अशा परिस्थितीत राज्य शासनाच्या वन विभागाने गोराई जेट्टी परिसरात कांदळवन उद्यान विकसित केले आहे. कदाचित हा देशातील पहिला प्रयोग असावा. अनेकांना 'कांदळवन' म्हणजे नेमके काय आणि त्याचे महत्त्व काय, याची पुरेशी माहिती नसते. ही उणीव भरून काढण्यासाठी आता मुंबईकरांना कांदळवनाचा अनुभव या उद्यानात घेता येईल.
सुमारे ३३ कोटी रुपये खर्च करून उभारलेले हे उद्यान एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात नागरिकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे. वन विभागाच्या मॅग्रोव्ह सेलमार्फत हा प्रकल्प राबविण्यात आला. पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देणे आणि कांदळवनांचे संरक्षण करणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. गोराईप्रमाणेच दहिसर खाडी परिसरातही सुमारे ३० एकर क्षेत्रात कांदळवन उद्यान उभारले जात आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ८० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, असे कांदळवन कक्षाचे मुख्य वन संरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी सांगितले.
काय आहे उद्यानात?
या उद्यानात पर्यटकांसाठी ७५०-८०० मीटरचा लाकडी बोर्डवॉक, बर्ड वॉचिंग टॉवर आणि अत्याधुनिक निसर्ग माहिती केंद्र उभारण्यात आले आहे. डिजिटल प्रदर्शन, माहिती फलक आणि मार्गदर्शकांच्या माध्यमातून कांदळवनांची जैवविविधता, त्यांचे पर्यावरणीय योगदान आणि किनारपट्टी संरक्षणातील भूमिका याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. जवळपास १८ प्रजातींचे कांदळवन हे केवळ वनस्पतीचे जाळे नाही, तर ते समुद्रकिनाऱ्याचे नैसर्गिक रक्षणकर्ते आहेत.
कांदळवने ही केवळ हिरवाई नसून शहराच्या अस्तित्वाची हमी आहेत. समुद्रकिनाऱ्याचे रक्षण करणारी ही नैसर्गिक ढाल वादळे, पूर आणि समुद्रपातळी वाढीच्या धोक्यांपासून संरक्षण करते. त्याचबरोबर हवेतील कार्बनडाय ऑक्साईड शोषून पर्यावरण संतुलित ठेवण्याचे महत्त्वाचे कामही कांदळवने करतात. मासे, स्थलांतरित पक्षी आणि विविध सागरी जिवांसाठी ती जीवनदायिनी ठरतात. वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि अतिक्रमणामुळे या परिसंस्थेवर गंभीर संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत कांदळवन उद्यान प्रकल्प हे संवर्धनाची प्रभावी चळवळ ठरू शकतात.