नोकरी गेली, १४ वर्षांचा अनुभव असूनही काम मिळेना; तरी हार नाही मानली, बनला रिक्षाचालक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 15:45 IST2024-12-31T15:44:13+5:302024-12-31T15:45:36+5:30
मुंबईच्या कॉर्पोरेट विश्वात चांगल्या हुद्द्यावर आणि एसीच्या थंडगार हवेत ऑफीसमध्ये बसून तब्बल १४ वर्ष नोकरी केलेला एक सुशिक्षीत मुंबईकर तरुण आता रिक्षाचालक बनला आहे.

नोकरी गेली, १४ वर्षांचा अनुभव असूनही काम मिळेना; तरी हार नाही मानली, बनला रिक्षाचालक!
मुंबईच्या कॉर्पोरेट विश्वात चांगल्या हुद्द्यावर आणि एसीच्या थंडगार हवेत ऑफीसमध्ये बसून तब्बल १४ वर्ष नोकरी केलेला एक सुशिक्षीत मुंबईकर तरुण आता रिक्षाचालक बनला आहे. हातची नोकरी गेली. मग दुसरी नोकरी शोधूनही मिळेना. मग खचून न जाता कमलेश कामतेकर नावाच्या तरुणानं थेट रिक्षा विकत घेतली. घर चालवण्यासाठी त्यानं रिक्षाचालक बनण्याचा निर्णय घेतला. याबद्दलची पोस्ट त्यानं लिंक्डइनवर केली आहे.
कमलेशननं त्याच्या पोस्टमध्ये त्याच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आहे. नोकरी मिळाली नाही म्हणून कोणतंही काम कमी न लेखता त्यानं रिक्षाचालक बनण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच नोकरी जाणं हा शेवट नसून नवी सुरुवात असल्याचंही म्हटलं आहे. कमलेशनं केलेल्या पोस्टवर अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. तसंच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
कमलेशच्या पोस्टमध्ये काय?
कमलेश एका बड्या कंपनीमध्ये ग्राफिक डिझाइनर म्हणून काम करत होता. गेली १४ वर्ष तो हे काम करत होता. पण पाच महिन्यांपूर्वी त्याची नोकरी गेली. नोकरी गेल्यानंतर त्यानं दुसऱ्या कंपनीत नोकरीसाठी बरेच प्रयत्न केले. अनेक मित्र-मंडळींशी बोललो पण नोकरी काही मिळाली नाही.
"कर्मचारी कपातीमुळे नोकरी जाऊन जवळपास पाच महिने झाले. ग्राफिक डिझाइनिंगमध्ये १४ वर्षांचा अनुभव गाठीशी होता. असिस्टंट क्रिएटिव्ह मॅनेजर म्हणून काम करत होतो. नोकरी गेल्यानंतर दुसरी नोकरी मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. अनेकांच्या ओळखीनंही काही नोकरी मिळते का? यासाठी प्रयत्न केले. पण आमच्याकडे तुमच्या पोझिशनसाठी जागा सध्या नाही किंवा इतका पगार सध्या आम्ही देऊ शकत नाही. आमचं बजेट कमी आहे अशीच उत्तरं मिळत होती. या सगळ्यानंतर अखेर मी दुसऱ्यासाठी कमी पगारात काम करण्यापेक्षा स्वत:चंच काहीतरी सुरू करण्याचं ठरवलं. भाड में जाये नोकरी अब खुदका बिझनेस करेंगे, पण माझ्या फिल्डमध्ये काही करणार नाही. तेव्हा मी माझं सगळं डिझाइनिंगच्या अनुभवावर पाणी सोडलं आणि रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. माझ्या नव्या सुरुवातीला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे", असं कमलेश यानं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कमलेशच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करुन त्याचं कौतुक केलं आहे. तर एकानं आता ग्राफीक डिझाइनिंग क्षेत्रात करिअर करायचं की नाही? असा प्रश्न कमलेशला विचारला. त्यावर कमलेश म्हणतो, "माझ्या मते AI हा प्रकार डिझाइनर्ससाठी अत्यंत घातक आहे. पुढील ५ ते ७ वर्षात याचा मोठा फटका ग्राफिक डिझाइनर्सच्या नोकऱ्यांना बसणार आहे"
कमलेशला याला काहींनी त्याच्या कमाईबाबतही विचारलं. त्यावर त्यानं सध्या मी किती कमाई करतो हा मुद्दा नाही. आपण कंपनीसाठी नव्हे तर आता स्वत:साठी काम करुन स्वत:साठी कमाई करतोय हे जास्त महत्वाचं आहे, असं म्हटलं आहे.