जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 06:39 IST2025-07-01T06:38:25+5:302025-07-01T06:39:00+5:30
या खरेदी व्यवहारांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीत १०३१ कोटी रुपयांचा महसूल मुद्रांक शुल्काच्या रुपाने जमा झाला आहे.

जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
मुंबई : गेल्या पाच महिन्यांप्रमाणे जून या सहाव्या महिन्यात देखील मुंबईतील मालमत्तांच्या खरेदीचा जोर कायम राहिला असून, जून महिन्यात मुंबईत एकूण ११ हजार ५२१ मालमत्तांची खरेदी झाली आहे. या खरेदी व्यवहारांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीत १०३१ कोटी रुपयांचा महसूल मुद्रांक शुल्काच्या रुपाने जमा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चालू वर्षात आतापर्यंत प्रत्येक महिन्याकाठी मुंबईत ११ हजार आणि त्यापेक्षा जास्त मालमत्तांची विक्री झाली आहे. या महिन्यांत झालेल्या एकूण मालमत्ता विक्रीमध्ये ८० टक्के प्रमाण हे निवासी मालमत्तांचे आहे, तर उर्वरित विक्री ही कार्यालयीन तसेच व्यावसायिक मालमत्तांची झालेली आहे.
याचसोबत यंदाच्या जूनमध्ये झालेल्या गृहविक्रीचे वैशिष्ट्य म्हणजे, ज्या घरांची किंमत ५ कोटी रुपये किंवा त्याहून अधिक आहे, अशा घरांचे विक्रीतील प्रमाण हे ६ टक्के इतके राहिले. गेल्यावर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत यामध्ये १ टक्का वाढ झाली आहे. तर, ज्या घरांची किंमत १ कोटी ते ५ कोटी रुपयांच्या दरम्यान आहे, अशा घरांच्या विक्रीमध्ये नगण्य घट नोंदली गेली आहे. पाचशे चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी आकारमानाच्या घरांच्या विक्रीचे प्रमाण हे ३९ टक्के इतके नोंदले गेले आहे.