Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Fraud Case: ५% नफा मिळवून देणार, कमावण्याच्या नादात ११ कोटी रुपये गमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:47 IST

Mumbai Investment Fraud: दरमहा ५ टक्के परताव्याचे आमिष दाखवून १०० हून अधिक गुंतवणूकदारांची ११ कोटींची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.

मुंबई : फोरेक्स ट्रेडिंग व क्रिप्टो ट्रेडिंग योजनांमध्ये गुंतवणुकीच्या रकमेवर दरमहा ५ टक्के परताव्याचे आमिष दाखवून १०० हून अधिक गुंतवणूकदारांची ११ कोटींची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी लाविश चौधरी ऊर्फ नवाब अली, क्यूएफएक्स ट्रेड, यॉर्कर एफएक्स, बॉटब्रो, बोटअल्फा या कंपनी व वित्तीय संस्था चालविणारे प्रवर्तक, भागीदार, संचालक, व्यवस्थापकांसह अनेकांवर माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दादर परिसरात राहणारे तक्रारदार राहुल घोले (४८) यांचा दुचाकींच्या सुट्या भागांच्या आयात-विक्रीचा व्यवसाय आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांनी सहारा स्टार हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'मनी एक्स्पो' या कार्यक्रमाला भेट दिली होती. या प्रदर्शनात आरोपी चौधरीने क्यूएफएक्स कंपनीच्या नावाने स्टॉल लावला होता. तेथे फोरेक्स ट्रेडिंग आणि क्रिप्टो ट्रेडिंगसाठी गुंतवणूक केल्यास दरमहा ५ टक्के परतावा मिळेल, असे सांगण्यात आले.

मनी एक्स्पोमध्ये सहभाग, विश्वास जिंकत घातला गंडा

२०२३ मध्येही चौधरीने बीकेसी येथे आयोजित मनी एक्स्पोमध्ये त्याच्या कंपनीचा स्टॉल लावला होता. तसेच, ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या मनी एक्स्पोमध्ये चौधरीने त्याच्या यॉर्कर कंपनीचा स्टॉल उभारला होता.

चौधरी हा सलगपणे मनी एक्स्पोमध्ये सहभाग घेत असल्याने आणि गुंतवणूकदारांना नियमित परतावा मिळत असल्याने घोले यांचा त्याच्यावर विश्वास बसला. घोले यांनी गुंतवणुकीची तयारी दर्शवल्यानंतर चौधरीने यॉर्कर कंपनीची वेब लिंक देत त्यांची नोंदणी करून खाते तयार केले. तसेच, घोले यांच्या मोबाइलवर 'बॉटब्रो' नावाचे डिजिटल वॉलेट अॅप सुरु करण्यात आले.

फेब्रुवारीपर्यंत ५ टक्के दराने मिळाला परतावा

वॉलेटमध्ये भारतीय रुपयांमध्ये केलेली गुंतवणूक अमेरिकन डॉलरमध्ये त्यावेळच्या दरानुसार दिसत होती. घोले यांनी १० जुलै २०२४ पर्यंत ८ लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर त्यांना दरमहा ५ टक्के परतावा मिळण्यास सुरुवात झाली. 

पुढे घोले यांनी स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या नावाने एकूण ५५.५८ लाख रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवर त्यांना फेब्रुवारी २०२५ पर्यंत ५ टक्के दराने परतावा मिळत होता.

अखेर पोलीस ठाण्यात तक्रार केली

परतावा मिळणे बंद झाल्यानंतर घोले आणि अन्य गुंतवणूकदारांनी माहिती घेतली असता, चौधरीने त्याच्या कंपनीचे नाव बदलून 'बोटअल्फा' केल्याचे ऑनलाइन माहितीवरून उघड झाले. 

दरम्यान, चौधरीविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केल्याचेही त्यांना समजले. अखेर आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने या गुंतवणूकदारांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली. तक्रारीवरून माटुंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Fraud: Investors lose ₹11Cr lured by 5% profit promise.

Web Summary : Over 100 investors lost ₹11 crore in Forex and crypto schemes promising 5% monthly returns. Lavish Chaudhary and associated firms are booked by Matunga police for fraud after investors stopped receiving promised returns and discovered the company name had changed.
टॅग्स :धोकेबाजीसायबर क्राइममुंबई पोलीसगुन्हेगारी