प्रभागांवर आक्षेप नाही; निवडणूक लवकर घ्या; आम्ही लढण्यासाठी सज्ज असल्याचा नेत्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 09:52 IST2025-10-07T09:52:46+5:302025-10-07T09:52:55+5:30
मनसेचे मुंबई अध्यक्ष व माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी प्रभाग पुनर्रचनेत फारसा बदल करण्यात आलेला नाही, याचा आनंद आहे. निवडणुकीसाठी मनसे पूर्ण सज्ज आहे. आता उशीर न करता निवडणूक लवकरात लवकर घ्या, असे मत व्यक्त केले.

प्रभागांवर आक्षेप नाही; निवडणूक लवकर घ्या; आम्ही लढण्यासाठी सज्ज असल्याचा नेत्यांचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिकेने प्रभागांची पुनर्रचना केली आहे. प्रभाग रचनेत २०१७प्रमाणेच यावेळीही प्रभागांची संख्या २२७ ठेवण्यात आली आहे. मात्र, पूर्व व पश्चिम उपनगरातील काही प्रभागांच्या हद्दीत बदल करण्यात आला आहे. बदललेल्या प्रभाग रचनेवर कोणत्याही राजकीय पक्षाने आक्षेप नोंदवला नाही. परंतु, निवडणूक लवकरात लवकर घेण्याची मागणी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.
मनसेचे मुंबई अध्यक्ष व माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी प्रभाग पुनर्रचनेत फारसा बदल करण्यात आलेला नाही, याचा आनंद आहे. निवडणुकीसाठी मनसे पूर्ण सज्ज आहे. आता उशीर न करता निवडणूक लवकरात लवकर घ्या, असे मत व्यक्त केले.
प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनीही काँग्रेस निवडणुकीसाठी सज्ज आहे, असे सांगून प्रभाग रचनेबाबत माजी नगरसेवकांशी एकदा चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखालील वंचित बहुजन आघाडीही मुंबई महापालिकेसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कंबर कसून तयार असल्याचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले.
प्रभाग रचनेमध्ये काहीही बदल झालेला नाही. ९९.९९ टक्के तेच प्रभाग आहेत. आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचा महापौर बसवण्याचे मुंबईकरांनी ठरवले आहे.
- आ. अमित साटम, मुंबई भाजप अध्यक्ष
प्रभाग रचनेत फारसा फरक पडला नसला तरी महायुतीकडे गेलेले काही माजी नगरसेवक आमच्या संपर्कात असून, स्वगृही येण्यासाठी इच्छूक आहेत. पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात आता २-३ इच्छूक उमेदवार तयार झाले आहेत. त्यामुळे गेलेल्यांना परत घ्यायचे की नाही, याचा निर्णय इच्छुकांशी बोलून घेतला जाईल. आम्ही निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहोत.
- आ. सचिन अहिर, उपनेते उद्धवसेना