Join us  

आठवीचे शिक्षक देताहेत दहावीच्या शिक्षकांना हिंदी विषयाचे प्रशिक्षण, अंधेरीतील शाळेचा अजब प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 1:21 PM

आठवीचे शिक्षक देताहेत दहावीच्या शिक्षकांना बदललेल्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण

मनोहर कुंभेजकरमुंबई - यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 10 वीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. त्यामुळे इयत्ता दहावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांचे तालुकास्तरावरील मराठी, इंग्रजी, हिंदी व गुजराती माध्यमाच्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण वर्गाचे शिक्षण निरीक्षक पश्चिम विभागाने  9 एप्रिल ते 20 एप्रिलपर्यंत पश्चिम उपनगरात आयोजन केले आहे. इयत्ता दहावीच्या हिंदी भाषेच्या शिक्षकांना प्रशिक्षण मुंबई महानगर पालिकेच्या आठवीच्या शिक्षकांकडून 11 एप्रिलला देण्यात आल्याचा अजब प्रकार अंधेरी पश्चिम येथील सी.डी.बर्फीवाला शाळेत  घडला आहे.

अंधेरी पश्चिम वर्सोवा पोलीस ठाण्यालागत असलेल्या सी.डी. बर्फीवाला शाळेत हिंदी विषयाचे प्रशिक्षण नुकतेच 11 एप्रिल रोजी आयोजित केले होते. या प्रशिक्षणात उपस्थित असलेल्या शिक्षकांना मुंबई महानगर पालिका शाळेत आठवीपर्यंत शिकणार्‍या शिक्षकांना तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

आशा मिश्रा व मीना अग्रवाल हे दोन हिंदी विषयांचे तज्ज्ञ शिक्षक मुंबई महानगर पालिका शाळेत आठवीपर्यंत शिकवत आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे या दोन शिक्षिका दहावीच्या शिक्षकांना तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करत आहेत. अभ्यास मंडळाकडे अथवा शिक्षण विभागाकडे अनुभवी शिक्षकांची वानवा आहे का? असा प्रश्न महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळ. मुंबईचे माजी सदस्य उदय नरे यांनी उपस्थित केला आहे.तर दहावीच्या विद्यार्थ्यांना न शिकवणारे शिक्षक व दहावीला असलेल्या विषय व विद्यार्थ्यांच्या समस्याचे विषय ज्ञान नसलेल्या शिक्षकांना देण्यात आलेले प्रशिक्षण कुचकामी असल्याचे मत अनेक शिक्षकांनी व्यक्त केले आहे.

पश्चिम विभागांतील वांद्रे ते दहिसर येथील सर्व अनुदानित,विनाअनुदानित माध्यमिक शाळा व सर्व मनपा शाळेतील इयत्ता 10 वीच्या शिक्षकांसाठी हे सदर प्रशिक्षण आहे. यामध्ये मराठी,इंग्रजी,हिंदी,गणित,विज्ञान, इतिहास व राज्यशास्त्र,भूगोल,संरक्षण शास्त्र विकास व कला रसास्वाद,संस्कृत या विविध विषयांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याचे परिपत्रक शिक्षण निरीक्षक पश्चिम विभागाने 5 एप्रिल रोजी काढले आहे. या प्रशिक्षण वर्गाला आपल्या शाळेतील इयत्ता 10 वीच्या वरील विषयानिहाय शिक्षकांना पाठण्याचे  या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण प्रक्रियेत खरे तर पश्चिम विभागाचे 95 च्या बॅचचे उप शिक्षण अधिकारी महेंद्र भोये हे या प्रशिक्षणासाठी नोडल अधिकारी आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता,तुम्हाला माझा नंबर कोणी दिला? माझा या प्रशिक्षणाशी काही संबंध नाही तर याविषयी काय सांगू अशी प्रतिक्रिया देत त्यांनी आपले हातवर केले आहेत.

दरम्यान,  राज्याचे शिक्षण मंत्री व उपनगराचे पालक मंत्री विनोद तावडे यांच्या उपनगरातच आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत हा प्रकार घडला आहे,तर राज्यासह मुंबईत देखिल शिक्षणाचा दर्जा किती खालावला आहे अशी बोलकी प्रतिक्रिया काही शिक्षकांनी व्यक्त  केली.

टॅग्स :शिक्षकविद्यार्थी