Mumbai Crime: कुलाबा येथील नौदलाच्या निवासी वसाहतीच्या संरक्षणासाठी तैनात जवानाकडील रायफल आणि मॅगझिन चोरी झाल्याच्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. तपासात, शस्त्र चोरी करणाऱ्याने ओळखपत्र दाखवून प्रवेश केला, त्यानंतर शस्त्र घेतल्यानंतर ते भिंतीवरून बाहेर फेकले. बाहेरील व्यक्तीने शस्त्र घेऊन पळ काढला. त्यापाठोपाठ अवघ्या काही मिनिटात तो व्यक्तीही बाहेर पडल्याचे सीसीटीव्हीवरून समोर येत आहे. इन्सास रायफल चोरीच्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. तेलंगणा राज्यातील नक्षलग्रस्त भाग असलेल्या आसिखाबाद जिल्ह्यातील एल्गापल्ली गावातून पोलिसांनी दोन भावांना अटक केली आहे.
नौदलाच्या निवासी संकुलाभोवती ६ सप्टेंबरच्या रात्री एक जवान पहाऱ्यावर होता. त्याची ड्युटी संपण्याची वेळ झाली तेव्हा एक व्यक्ती नौदलाच्या गणवेशात आला. त्याने ओळखपत्राद्वारे संकुलात ७ वाजता प्रवेश केला होता. त्यानंतर पहाऱ्यावर असलेला जवानाने या व्यक्तीकडे रायफल आणि मॅगझीन देऊन आपल्या निवास व्यवस्थेकडे गेला. त्यानंतर, संबंधित व्यक्तीने ते रायफल आणि मॅगझीन भिंतीवरून बाहेर फेकले. नेव्ही नगर येथील सीसीटीव्हीमध्ये संशयित कैद झाला आहे. तसेच, पोलिसांच्या हाती लागलेल्या वेगवेगळ्या सीसीटीव्हीमध्ये शस्त्र चोरी करणाऱ्याने कॅमेरामध्ये चेहरा दिसणार नाही याची खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे. प्रवेशद्वारावर आतमध्ये येणाऱ्यांची नोंद घेतली नसल्याने त्याने नेमके कुणाचे ओळखपत्र दाखवले याबाबत माहिती मिळालेली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.
शस्त्रास्त्र चोरीच्या या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठी नौदलाने तातडीने चौकशी समिती नेमली होती. चोरीस गेलेली रायफल आणि दारूगोळ्याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या मदतीने व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली. आता या तपासाला अखेर यश आलं आहे. राकेश दुबला आणि उमेश दुबला अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दोघांकडून एक इन्सास रायफल, ३ मॅगझिन आणि ४० जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे तपास केला असता आरोपी लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनवर गेले होते जिथून त्यांनी ट्रेन पकडली आणि तेलंगणाला गेले. त्यानंतर गुन्हे शाखेचे एक पथक तेलंगणाला रवाना झाले आणि स्थानिक पोलिसांची मदत घेतली आणि गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने दोघांनाही त्यांच्या गावातून अटक करण्यात आली.
आतापर्यंतच्या तपासात आरोपी राकेश हा नौदलात काम करतो आणि त्याने मुंबईतही सेवा बजावल्याचे समोर आलं आहे. सध्या तो केरळमध्ये तैनात आहे. चोरीच्या एक दिवस आधी राकेश मुंबईत आला होता आणि चोरीच्या दिवशी त्याचा भाऊ उमेश मुंबईत पोहोचला. चोरी करण्यासाठी, राकेशने बनावट ओळखपत्र वापरून नौदल तळात प्रवेश केला. तो स्वतः नौदलात काम करतो म्हणून त्याला बोलायचं कसं हे माहित होते. त्याने दिशाभूल करून रायफल चोरली. त्यानंतर त्याने रायफल आणि जिवंत काडतुसे प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळली आणि बाहेर उभ्या असलेल्या त्याच्या भावाकडे फेकली. त्यानंतर दोघेही तेथून पळून गेले.