जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:32 IST2025-10-29T13:32:11+5:302025-10-29T13:32:27+5:30
खासगी कंपनीत नोकरीला असलेल्या विवाहितेच्या तक्रारीनुसार, २०२१ मध्ये तिचा विवाह झाला

जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
मुंबई : आई-वडिलांनी जेवण बनवायला शिकवले नाही का? या सासूच्या टोमण्यांपासून, पतीच्या मारहाणीपर्यंत सहनशीलतेचा कडेलोट झाला आणि अखेर वरळी कोळीवाड्यातील ३६ वर्षीय विवाहितेने पोलिसांत धाव घेतली. विवाहितेच्या तक्रारीनुसार, दादर पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध सोमवारी गुन्हा नोंदवला आहे.
खासगी कंपनीत नोकरीला असलेल्या विवाहितेच्या तक्रारीनुसार, २०२१ मध्ये तिचा विवाह झाला. विवाहानंतर पती, सासू आणि नणंद यांनी वारंवार मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ केला. नोकरीनिमित्त बाहेर काम करणाऱ्या महिलेला पतीच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली. त्याने ती आणखीन अस्वस्थ झाली. कोविडच्या काळात सासूचे नातेवाईक हे घरी येऊन राहत होते. त्यावेळी सासूने सर्व जबाबदारी एकटीवर टाकली. मात्र, जास्त लोकांचे जेवण बनविण्याचा अनुभव नसल्याने त्यात चुका काढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर वारंवार 'तुला तुझ्या आईवडिलांनी जेवण बनवायला शिकविले नाही का?' म्हणत टोमणे मारण्यास सुरुवात केली. पतीनेही मारहाण केली. अखेर, अत्याचार वाढल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.