मुंबईच्या डबेवाल्यांना लवकरच १०५ ई-बाइक देणार, महापौर रितू तावडेंची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 17:04 IST2026-03-27T17:02:33+5:302026-03-27T17:04:33+5:30
मुंबईच्या वेशीवर चार ठिकाणी प्रवेशद्वार उभारण्याचे प्रस्तावित असून, त्यापैकी एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर आधारित उभारण्याचा मानस आहे.

मुंबईच्या डबेवाल्यांना लवकरच १०५ ई-बाइक देणार, महापौर रितू तावडेंची घोषणा
मुंबई :
मुंबईच्या वेशीवर चार ठिकाणी प्रवेशद्वार उभारण्याचे प्रस्तावित असून, त्यापैकी एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर आधारित उभारण्याचा मानस आहे. त्याचबरोबर डबेवाल्यांना १०५ ई-बाइक्स दिल्या जातील, अशी माहिती महापौर रीतू तावडे यांनी दिली.
वांद्रे येथील 'मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र'ला तावडे यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली. तसेच डबेवाल्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
शहरात दररोज एक लाख डब्यांचे वितरण
डबेवाला सेवेची सुरुवात १८९० मध्ये झाली असून, या सेवेची मुळे वारकरी संप्रदायाशी जोडलेली आहेत. सध्या मुंबईत दररोज सुमारे एक लाख डबे वितरित केले जातात; कोविडपूर्व काळात ही संख्या दुप्पट होती. टाळेबंदीच्या काळात मुंबईकरांसह जगभरातून मिळालेल्या मदतीमुळे डबेवाल्यांचा उदरनिर्वाह सुरू राहिला आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळाला. या संकटातून प्रेरणा घेऊन ही सेवा नव्या ऊर्जेने पुन्हा उभी राहत असल्याची माहिती संघटनेने दिली.
'सांघिक कार्य, वेळेचे अचूक नियोजन कौतुकास्पद'
१. महापौरांनी डबेवाल्यांच्या दैनंदिन कामकाजातील 'सॉर्टिंग' (वर्गीकरण), 'कोडिंग' आणि वितरण प्रक्रियेची सविस्तर माहिती घेत त्यांच्या कौशल्याचे त्यांनी कौतुक केले.
२. डबेवाल्यांशी संवाद साधताना तावडे म्हणाल्या की, सुमारे १३५ वर्षांहून अधिक काळ अखंडपणे सुरू असलेली डबेवाल्यांची सेवा ही कौतुकाच्या पलीकडची आहे.
३. संपूर्ण मुंबईत दुपारी ठराविक वेळेत जेवणाचे डबे पोहोचवण्याची ही व्यवस्था लाखो नागरिकांच्या जीवनाशी निगडित आहे.
४. डबेवाल्यांचे सांघिक कार्य, वेळेचे अचूक नियोजन आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती ही व्यवस्थापन शिकणाऱ्या प्रत्येकासाठी आदर्श आहे, असे त्यांनी नमूद केले.