ऑनलाइन टास्क फसवणुकीत मुंबईतील एका बँक कर्मचाऱ्याने २.५९ लाख रुपये गमावले. याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बँक कर्मचाऱ्याला त्याच्या मोबाईलवर लिंक्स क्लिक करणे आणि कंटेंट लाईक करणे यासारख्या साध्या ऑनलाइन कामांतून अतिरिक्त पैसे कमवा, असा मेसेज आला. प्रत्येक कामासाठी त्याला ५० रुपये दिले जातील, असेही सांगण्यात आले. यावर विश्वास ठेवून बँक कर्मचारी त्यांच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील झाला. सुरुवातीला बँक कर्मचार्याला त्याच्या कामाचे पैसे मिळाले. त्यामुळे त्याचा कामावरील विश्वास वाढला. मात्र, पुढील दोन दिवसांतच त्याच्या खात्यातील २.५९ लाख रुपये गायब झाले.
पीडित व्यक्ती आयडीएफसी फर्स्ट बँकेतील कर्मचारी आहे आणि सायन पूर्व येथील रहिवासी आहे. दरम्यान, ३० जून रोजी तो कामावर असताना त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला. या मेसेजमध्ये लिंक्सवर क्लिक करणे आणि कंटेंट लाईक करणे यासारखी साधी ऑनलाइन कामे पूर्ण करून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतो आणि प्रत्येक कामासाठी त्याला ५० रुपये मिळतील, असे लिहिले. तसेच तुम्ही केलेल्या कामांचे स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर रक्कम तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाईल, असेही आश्वासन देण्यात आले. यामुळे तो देखील एका टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील झाला. सुरुवातीला त्याने केलेल्या कामाचे त्याला २५०० रुपये मिळाले.
बँक कर्मचाऱ्याचा विश्वास जिंकल्यानंतर समोरच्या लोकांनी त्याला प्रीपेड टास्कसाठी आगाऊ पैसे मागितले आणि हे पैसे विविध बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. सर्व व्यवहार ३० जून ते १ जुलै दरम्यान झाले. परंतु, जेव्हा बँक कर्मचाऱ्याने त्याने गुंतवलेले पैसे आणि नफा काढून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याला खात्यातून पैसे काढता आले नाहीत. त्याने समोरच्या लोकांशी संपर्क साधला. पंरतु, ते टाळाटाळ करू लागले. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे बँक कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच त्याने बीकेसी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.