Mumbai: करी रोड, लोअर परळमधील प्रवास ‘कोंडीमुक्त’ कधी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:55 IST2025-06-16T15:51:03+5:302025-06-16T15:55:19+5:30

Mumbai Traffic: मुंबईमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून आहे.

Mumbai Currey Road, Lower Parel Traffic Free | Mumbai: करी रोड, लोअर परळमधील प्रवास ‘कोंडीमुक्त’ कधी होणार?

Mumbai: करी रोड, लोअर परळमधील प्रवास ‘कोंडीमुक्त’ कधी होणार?

महेश कोले
लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : मुंबईमध्येवाहतूक कोंडीची समस्या दिवसागणिक वाढत असून त्याचे नियोजन करण्यात प्रशासन कमी पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दक्षिण मुंबईतील करी रोड, लालबाग, लोअर परळ आणि वरळी भागात सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत असल्याने यावर तत्काळ उपाय करावा, असे त्यांचे म्हणणे आहे. 

करीरोड पुलावरून लोअर परळ आणि लालबाग या दोन्ही दिशांना मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होते. अशातच प्रशासनाने करी रोड पुलाच्या लालबागच्या दिशेला लोखंडी जाळ्यांचे दुभाजक घातल्याने वाहतूक कोंडीमध्ये भर पडत आहे. या पुलाच्या दोन्ही दिशेला नागरी वस्ती असल्याने या भागातील वाहनांना पुलावर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. दुभाजकामुळे वळण घेण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने अशा वेळी दोन्ही दिशेला वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. परिणामी नागरिक तसेच वाहन चालकांना अनेक हॉर्नच्या कर्कश आवाजासोबतच वाहतूक कोंडीसारख्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

मोहीम थंडावल्याचा फटका
वरळी आणि लोअर परळ या दोन्ही दिशांना संध्याकाळी आणि सकाळी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होते. एल्फिन्स्टन पूल पाडण्याच्या पार्श्वभूमीवर  डिलाईल रोड, वरळी आणि लोअर परळ भागातील रस्त्यावरील वाहने हटविण्याची मोहीम हाती घेतली. परंतु, ती पुन्हा थंडावल्याने रस्त्याच्या दुतर्फा  पार्किंग केली जाते. तसेच लोअर परळ भागात डॉन मिलच्या समोरच्या फुटपाथ आणि रस्त्यावर अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याने वाहन चालकांसोबत पादचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.  

Web Title: Mumbai Currey Road, Lower Parel Traffic Free