Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६ टक्के, तर रुग्ण दुपटीचा दर ७२ दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 23:02 IST

शहर उपनगरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६ टक्क्यांवर असून रुग्ण दुपटीचा कालावधी ७२ दिवसांवर येऊन ठेपला आहे.

मुंबई – मुंबईकरांसाठी सुखद बाब म्हणजे मागील पाच महिन्यांच्या संघर्षानंतर शहर उपनगरात एकूण कोविड वाढीचा दर ०.९७ टक्क्यांवर आला आहे. शहर उपनगरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६ टक्क्यांवर असून रुग्ण दुपटीचा कालावधी ७२ दिवसांवर येऊन ठेपला आहे. आतापर्यंत शहर उपनगरात कोविडच्या ५ लाख ५ हजार ९८२ चाचण्या झाल्या आहेत.

मुंबईत १ हजार १०९ रुग्ण व ६० मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या १ लाख ११ हजार ९९१ इतकी झाली असून बळींचा आकडा ६ हजार २४७ आहे. आतापर्यंत ८५ हजार ३२७ रुग्ण कोविडमुक्त झाले असून सध्या २० हजार १२३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या ६० मृत्यूंपैकी ४२ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील ४३ रुग्ण पुरुष व १७ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी २ जणांचे वय ४० वर्षांखालील होते. ४८ जणांचे वय ६० वर्षाहूंन अधिक होते. तर उर्वरित १० रुग्ण ४० ते ६० वयोगटातील आहेत.

शहर उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळीत ६२२ सक्रिय कंटेनमेंट क्षेत्र आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ५ हजार ९६० आहे. गेल्या २४ तासांत रुग्णांच्या संपर्कातील अतिजोखीम असलेल्या ३ हजार ५९७ सहवासितांचा शोध घेण्यात पालिकेच्या आरोग्य विभागाला यश आले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस