मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा पादचारी पूल कोसळल्याची घटना घडल्यावर दुर्घटनेतील जखमींना रूग्णवाहिकेने जीटी आणि सेंट जॉर्ज रूग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयामध्ये धावपळ सुरू होती. तसेच काही जखमींसह मृतांच्या नातेवाईकांचीही गर्दी रूग्णालयामध्ये वाढली होती. दरम्यान काही जखमींना सायन रूग्णालयामध्येही दाखल केल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली होती.जखमींवर डॉक्टरांकडून युद्धपातळीवर उपचार सुरू होते. रुग्णालयामध्ये पोलिसांचाही बंदोबस्त वाढविण्यात आला होता. दरम्यान, नातेवाईकांमध्येही भीती निर्माण झाली होती. जखमींना पाहण्यासाठी अंबरनाथ आणि बदलापूर येथून नातेवाईक रूग्णालयात आले होते. दुर्घटनेतील जखमी सुकेश चावला (३४) याची माहिती मिळताच त्याच्या आईने रुग्णालयाकडे धाव घेतली होती. जखमींच्या नातेवाईकांची संख्या वाढल्याने डॉक्टरांना उपचार करण्यास अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे काही नातेवार्इंकाना आपल्या माणसांना भेटण्याची परवानगी दिली जात नव्हती. रुग्णालयामध्ये रक्त पेढ्यातून ज्याला रक्ताची आवश्यकता आहे, त्याना रक्त पुरवठा केला जात होता. रुग्णालयातील इतर विभागातील डॉक्टर, परिचारिका आणि वार्ड बॉय सगळे जखमींवर उपचारासाठी धावपळ करत होते.
Mumbai CST Bridge Collapse: रुग्णालयाकडे जखमींच्या नातेवाइकांनी घेतली धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 05:04 IST