Join us  

पेंग्विन अन् नाईट लाईफची काळजी करण्याऐवजी पालिकेनं लोकांचे जीव वाचवावेत- नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 8:10 AM

काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल दुर्घटनेवरून पुन्हा एकदा शिवसेना आणि आदित्य ठाकरेंला लक्ष्य केलं आहे

मुंबई- काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल दुर्घटनेवरून पुन्हा एकदा शिवसेना आणि आदित्य ठाकरेंला लक्ष्य केलं आहे. पेंग्विनकडे विशेष लक्ष आणि नाईट लाईफचा मुद्दा लावून धरण्यापेक्षा लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई महापालिका का करत नाही?, असा सवालही नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. पुन्हा तेच आरोप-प्रत्यारोप आणि पुलाचे ऑडिट करण्याच्या घोषणा होतील, पण ठोस काहीच होणार नाही. सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेला मनुष्यजीवाची काहीच किंमत नाही काय, असा टोलाही नितेश राणेंनी पालिकेच्या आडून शिवसेनेला लगावला आहे.राणीच्या बागेत असलेल्या पेंग्विन पक्षामध्येही गेल्या काही महिन्यांपासून युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे जास्तच रस घेत आहेत. तर काही वर्षांपूर्वी नाईट लाईफसाठी आदित्य ठाकरेंनी आवाज उठवला होता. या मुद्द्यांवरूनही नितेश राणेंनी वेळोवेळी त्यांच्या हल्ला चढवला होता. आता या दुर्घटनेवरून नितेश राणेंनी शिवसेना आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. कमला मिल, एलफिन्स्टन ब्रिज आणि घाटकोपर इमारत दुर्घटनेच्या चौकशीदरम्यान अनेकदा छोट्या अधिकाऱ्यांचेच बळी दिले जातात. त्यांच्याऐवजी महापालिका आयुक्तांना जबाबदार का धरलं जातं नाही. तसेच महापौरांना राजीनामा का द्यायला सांगत नाहीत, असा प्रश्नही नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून दादाभाई नौरोजी मार्गापलीकडे जाण्यासाठी वापरात असलेल्या पादचारी पुलाचा भाग गुरुवारी संध्याकाळी भरगर्दीच्या वेळी भरधाव वाहनांनी भरलेल्या रस्त्यावर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत तीन महिलांसह 6 जणांचा मृत्यू, तर 30हून अधिक जण जखमी झाले. दुर्घटनास्थळी कोसळलेले ढिगारे उपसण्याचे काम सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

 

टॅग्स :नीतेश राणे सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना