Join us  

Mumbai CST Bridge Collapse : ३ वर्षीय चिमुरडीने आईसारखी माया करणारा बाप गमावला  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 9:13 PM

तपेंद्रसिंग यांचे मुलीवर आईप्रमाणे खूप प्रेम होते. 

ठळक मुद्देतपेंद्रसिंगला मुलीला उच्चशिक्षण द्यायचे होते.तपेंद्रसिंगच्या मृत्यूची माहिती रात्री १० वाजता त्यांच्या घरच्यांना कळाली आणि संपूर्ण चाळीवर शोककळा पसरली.

मुंबई - मुलगी काही महिन्यांची असताना पत्नी घर सोडून गेली. नंतर चिमुकल्या मुलीची जबाबदारी सीएसटीएम येथील पूल दुर्घटनेत दगावलेल्या तपेंद्रसिंग लुहिया यांच्यावर होती. घरचे त्याला दुसरे लग्न कर म्हणून सांगत होते. मात्र, त्याने मुलीला सावत्र आई नको म्हणून दुसरे लग्न करण्याचा विचार मनातून काढून टाकला होता. तपेंद्रसिंग यांचे मुलीवर आईप्रमाणे खूप प्रेम होते. 

तपेंद्रसिंगला मुलीला उच्चशिक्षण द्यायचे होते. यंदा मुलीला शाळेत टाकायचे म्हणून त्याने तयारी देखील केली होती. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते आणि तपेंद्रसिंगला आमच्या पासून हिरावून नेले. वडाळ्यातील कात्रज रोड या ठिकाणी असलेल्या माधवनगर येथील चाळीत तपेंद्रसिंग लुहिया (२८) हा आई चंद्रा, लहान भाऊ सुनील आणि ३ वर्षाची मुलगी तनिष्का यांच्यासोबत गेल्या काही वर्षांपासून भाडेतत्वावर राहण्यास होता. तपेंद्रसिंगला दोन बहिणी असून त्यांचा विवाह होऊन त्या सासरी राहतात. मुलीच्या जन्मानंतर काही महिन्यांनीच तपेंद्रसिंग यांची पत्नी घर सोडून निघून गेली होती. पत्नी सोडून गेल्यावर मुलीची सर्व जबाबदारी तपेंद्रसिंग यांच्यावर आली होती. सीएसटीएम येथील एका जाहिरात कंपनीत ऑफिस बॉय म्हणून नोकरी करणारे तपेंद्रसिंग ७ वाजता नेहमीप्रमाणे कार्यालय बंद करून घरी जाण्यास निघाले होते. वाटेत जाता जाता त्याने अंधेरी येथे राहणाऱ्या बहिणीला फोन केला होता. मात्र, नंतर पुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटने तपेंद्रसिंग यांचा मृत्यू झाला. तपेंद्रसिंगच्या मृत्यूची माहिती रात्री १० वाजता त्यांच्या घरच्यांना कळाली आणि संपूर्ण चाळीवर शोककळा पसरली.

टॅग्स :सीएसएमटी पादचारी पूलमृत्यूसीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनाछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस