मुंबई पोलिसांनी साकीनाका आणि पवई येथे धाडी टाकल्या. तिथे जे सुरू होतं ते बघून अधिकारीही चक्रावले. एक तरुणाला खाली बसवण्यात आले होते आणि बाऊन्सर त्याला मारहाण करण्याची धमकी देत पैसे वसूल करत होते. या सगळ्याची सुरूवात डेटिंग ॲपवरून होत होती. या प्रकरणात पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे. यात तीन तरुणींचाही समावेश आहे.
डेटिंग ॲपवरून तरुणी तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायच्या आणि घाटकोपरमधील साकीनाका येथील कॅफे क्लबमध्ये भेटीसाठी घेऊन जायच्या. तिथे गेल्यानंतर भेटीसाठी बोलावलेल्या तरुणांना धमकवायच्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेटिंग ॲपवर या तरुणी श्रीमंत तरुणांना हेरायच्या आणि त्यांच्याशी मैत्री करायच्या. त्यांना प्रेमात असल्याची खात्री देत भेटायला बोलवायच्या.
घाटकोपरमधील साकीनाका येथील कॅफे क्लबमध्ये या तरुणी तरुणांना डेटसाठी बोलवायच्या. कॅफे क्लबमध्ये तरुणांची भेट झाल्यानंतर भरपूर पदार्थ ऑर्डर करायच्या. २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत बिल होईल इतक्या गोष्टी या तरुणी मागवायच्या.
त्याचबरोबर तुझ्याविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार करते. पोलीस ठाण्यात जाऊन तुझ्यावर नको ते केल्याचे सांगणार अशा धमक्या देऊन ब्लॅकमेलिंग करायच्या. अशा प्रकारच्या डेटिंगचे हे रॅकेट असल्याचे तपासातून समोर आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, यासाठी मुंबईतील तरुणींबरोबर दिल्लीतूनही २५ ते ३० तरुणी आणण्यात आलेल्या होत्या. या सगळ्यामध्ये कॅफे मालक स्वतः सामील असल्याचेही पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी पवईतून १० जणांना अटक केली. त्यात तीन तरुणींचा समावेश आहे.