Join us

शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 19:00 IST

खराब हस्तलेखनामुळे एका आठ वर्षाच्या विद्यार्थ्याला मेणबत्तीचे चटके दिल्याप्रकरणी मालाड येथील शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

खराब हस्तलेखनामुळे एका आठ वर्षाच्या विद्यार्थ्याला मेणबत्तीचे चटके दिल्याप्रकरणी मालाड येथील शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (२८ जुलै) संध्याकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कुरार गाव पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मोहम्मद हमजा खान हा लक्षधाम शाळेत इयत्ता तिसरीत शिकतो. तर, आरोपी शिक्षिका राजश्री राठोड ही मालाड पूर्व येथील फिल्म सिटी रोडवरील गोकुळधाम येथील जेपी डेक्स बिल्डिंगमध्ये खाजगी शिकवणी देते. हमजाची बहीण रुबिनाने त्याला नेहमीप्रमाणे संध्याकाळी ७:०० वाजताच्या सुमारास राजश्री यांच्याकडे सोडले. त्यानंतर रात्री ९ वाजताच्या सुमारास राजश्रीने हमजा याचे वडील मुस्तकीन गुलाम रसूल खान यांना फोन करून आपल्या मुलाला घेऊन जायला सांगितले. त्यानंतर मुस्तकीन गुलाम रसूल खानने रुबिनाला हमजाला आणण्यासाठी पाठवले. रुबिना हमजाला आणयाला गेली, तेव्हा तो रडत असल्याचे दिसले. रुबिनाने विचारपूस केली असता राजश्रीने हमजा हा अभ्यास टाळत असल्यामुळे रडण्याचे नाटक करत असल्याचे सांगितले.

घरी गेल्यानंतर हमजाने त्याच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार मुस्तकीन गुलाम रसूल खान यांना सांगितला. त्यानंतर मुस्तकीन गुलाम रसूल खानने ताबडतोब राजश्रीला फोन लावून जाब विचारला. त्यावेळी राजश्रीने हमजाला शिस्त लावण्यासाठी हे कृत्य केल्याची कबूल दिली. त्यानंतर मुस्तकीन गुलाम रसूल खान आणि राजश्री यांच्यात वाद झाला.

यानंतर हमजाला वैद्यकीय उपचारांसाठी कांदिवली पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले. याप्रकरणी मुस्तकीन गुलाम रसूल खान राजश्रीविरोधात कुरार गाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मुलाला स्वेच्छेने दुखापत आणि क्रूरता केल्याबद्दल राजश्रीविरुद्ध पोक्सो आणि बीएनएसच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीमुंबईमालाड पश्चिममहाराष्ट्र