कामाच्या पहिल्याच दिवशी घर लुटणारी मोलकरीण, अशी शोधायची सावज...

By मनीषा म्हात्रे | Updated: January 23, 2025 06:19 IST2025-01-23T06:19:04+5:302025-01-23T06:19:48+5:30

Mumbai Crime News: मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात विविध इमारती फिरून घरकामाचा शोध घ्यायचा. कामावर रुजू होताच अवघ्या काही तासांत साफ सफाईच्या बहाण्याने घरातील किमती ऐवजावर डल्ला मारणाऱ्या मोलकरणीने सर्वांचीच झोप उडवली आहे.

Mumbai Crime News: Maid robs house on first day of work | कामाच्या पहिल्याच दिवशी घर लुटणारी मोलकरीण, अशी शोधायची सावज...

कामाच्या पहिल्याच दिवशी घर लुटणारी मोलकरीण, अशी शोधायची सावज...

- मनीषा म्हात्रे
मुंबई - मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात विविध इमारती फिरून घरकामाचा शोध घ्यायचा. कामावर रुजू होताच अवघ्या काही तासांत साफ सफाईच्या बहाण्याने घरातील किमती ऐवजावर डल्ला मारणाऱ्या मोलकरणीने सर्वांचीच झोप उडवली आहे. वनिता गायकवाड (३८) असे या महिलेचे नाव असून तिने आतापर्यंत १०० हून अधिक गुन्हे केल्याचा संशय आहे. 

वाशी सेक्टर १९ मधील अभिमन्यू सोसायटीत राहणाऱ्या झाकीर म्हाते (५९) यांच्या घरातील साडेपाच तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरून वनिताने पळ काढला होता. चोरी झाल्याच्या दिवशीच वनिताला साफसफाई तसेच केअर टेकर म्हणून कामावर ठेवले होते. वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याची माहिती घाटकोपर कक्षातील पोलिस हवालदार अजय बल्लाळ यांना मिळाली. खबऱ्यामार्फत वनिता माहूल गाव परिसरातील घरी असल्याचे समजल्यानंतर तिला ताब्यात घेतले. तिला अटक झाल्याचे कळताच शहरातील विविध पोलिसांनी तिची चौकशी केली. वाशी पोलिसांनी तिच्यासह मानलेल्या भावाला अटक करत साडेतीन तोळे सोनेही जप्त केले. 

अशी शोधायची सावज...
वनिता उच्चभ्रू वसाहतीत जाऊन घरकाम मागते. पहिल्या दिवशी व्यवस्थित काम करून, चांगला संवाद साधून मालकवर्गाचा विश्वास संपादन करायची. संधी मिळताच त्याच दिवशी किंवा दुसऱ्याच दिवशी घरातल्या किमती वस्तू चोरून पोबारा करते. पहिल्या दिवशी काम करताना ती किमती वस्तू कुठे असाव्यात याचा अंदाज घेते. पुढे ऐवज हाती लागताच कागदपत्रे आणण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडून पसार व्हायची. 

मौजमजा आणि पुन्हा दुसऱ्या सावजाचा शोध...
किमती ऐवजावर हात साफ केल्यानंतर मित्र, नातेवाईक किंवा अन्य ओळखीच्या व्यक्तीकडे घरातील व्यक्ती आजारी असल्याचा बहाणा करत त्यांच्यामार्फत या वस्तूंची सोनाराकडे विक्री करायची. पुढे मजेसाठी या पैशांचा वापर करायचा  काही पैसे अटकेनंतर जामिनासाठीही वापर करत होती. 

अख्खं कुटुंब अभिलेखावर...
वनिताचा पहिल्या नवऱ्याशी घटस्फोट झाल्यानंतर ती लिव्हिंगमध्ये राहते. दुसरा नवरादेखील तडीपार आहे. दोन्ही मुलांविरुद्ध गुन्हे नोंद  आहेत. अटक होण्यापूर्वी तिने एका घरात चोरी केली.  त्यातील तीन लाख रुपये तिने अटकेत असलेल्या मुलाला सोडविण्यासाठी खर्च केल्याचेही समोर आले.

Web Title: Mumbai Crime News: Maid robs house on first day of work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.