मुंबईतील वांद्रे पोलिसांच्या हद्दीत अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी एका ४० वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली. तसेच या गुन्ह्यात पतीला साथ दिल्याबद्दल पीडिताच्या बहिणीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या पीडिताची आरोपींनी घरीच प्रसूती केली. परंतु, पीडिताची प्रकृती बिघडली आणि तिला कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता आपली मोठी बहीण आणि मेहुण्यासोबत एकाच घरात राहत होती. दरम्यान, मार्च २०२४ मध्ये बहिणीच्या नवऱ्याने तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला. त्यानंतर पुढील चार महिने त्याने अनेकदा तिच्यावर बलात्कार केला. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर तिच्या मोठ्या बहिणीला हा संपूर्ण प्रकार सांगितला. परंतु, मोठ्या बहिणीने पतीची पोलिसांत तक्रार करण्याऐवजी पीडितीला याबाबत कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली.
रुग्णालयात गेल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड
पतीचा गुन्हा लपवण्यासाठी मोठ्या बहिणीने अल्पवयीन मुलीला डॉक्टरकडे जाऊ दिले नाही किंवा कोणत्याही वैद्यकीय उपचारांसाठी बाहेर जाऊ दिले नाही. मोठ्या बहिणीने घरीच पीडिताची प्रसूती केली. परंतु, पीडिताची प्रकृती बिघडल्यानंतर तिला भाभा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. याबाबत वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी ताबडतोब पोलिसांना कळवले. पीडिताच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिसांनी तिचा जाब नोंदवून घेतला.
भाऊजींसह मोठ्या बहिणीलाही अटक
पीडिताच्या जबाबाच्या आधारे, तिच्या मोठ्या बहिणीसह भाऊजींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पीडिता आणि तिच्या बाळावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि दोघांचीही प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.