Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Crime: समोसा-कटलेटच्या बिलावरून वाद झाला, संतापलेल्या ग्राहकाने दुकानदाराचे बोटच तोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 15:35 IST

Mumbai Malad Crime: मुंबईतील मालाडमध्ये समोसा-कटलेटच्या बिलावरून वाद झाल्यानंतर संतापलेल्या ग्राहकाने दुकान मालकाचे चावा घेत बोटच तोडून वेगळे केले.

समोसा आणि कटलेट खाल्यानंतर दुकानदाराने दिलेल्या बिलावरून वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की ग्राहकाने दुकानदाराचे तोंडानेच चावत बोट तोडले. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ग्राहकाला अटक केली आहे. 

मुंबईतील मालाडमध्ये २८ मार्च रोजी रात्री ही घटना घडली आहे. साडेआठ वाजेच्या दरम्यान, शिवाजी चौकात असलेल्या एका नाश्ताच्या दुकानात आरोपी गेला होता. रंजित हरिवंश सिंह हे दुकानात होते. त्यांनी आरोपीला समोसा आणि कटलेट दिला. खाऊन झाल्यावर रंजित यांच्या मुलाने आरोपीकडे पैसे मागितले, तर तो चिडला. 

ऑनलाइन पैसे देतो म्हणाला पण...

बिल मागितल्यानंतर त्याने ऑनलाइन पैसे पाठवतो, असे सांगितले. पण, त्याने बिल देण्यापूर्वीच शिवीगाळही सुरू केली. मुलाला शिव्या देत असल्याचे बघून रंजित सिंह हे त्याला समजावू लागले. ते आरोपीला म्हणाले की, तू इथून जा. हे ऐकून त्याला आणखी राग आला. 

रागातच आरोपीने रंजित सिंह यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डाव्या हाताचे मधले बोट त्याने दातांनी चावले. तो इतक्या जोरात चावला की, बोटाचे तुकडाच तोडला. इतकंच नाही, तर आरोपीने त्यांच्या उजव्या हाताच्या दोन बोटांनाही चावा घेतला. त्यांना गंभीर जखमा झाल्या आहेत. 

मुलगा आणि कर्मचारी धावले

आरोपी रंजित सिंह यांना चावत असल्याचे बघून कर्मचारी आणि त्यांचा मुलगा धावला. त्यांनी आरोपीला पडले. रंजित यांना तातडीने परळ येथील केईएम रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. लक्ष्मण मंगळ मलिक असे आरोपीचे नाव असून, दिंडोशी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Crime: Argument Over Bill Leads to Shopkeeper's Finger Bitten Off

Web Summary : In Mumbai, a dispute over a samosa and cutlet bill escalated when a customer bit off a shopkeeper's finger. Police arrested the accused, Lakshman Malik, after the violent incident in Malad.
टॅग्स :गुन्हेगारीमुंबई पोलीसअटक