Mumbai covid case: जगातील काही देशांमध्ये कोविड पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच मुंबईत दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. त्यांचा कोविडमुळे मृत्यू झाला नसल्याचे आधी रुग्णालयाने सांगितले. पण, ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर किशोर पेडणेकर आणि आमदार अजय चौधरी यांनी कागदपत्रे दाखवली. त्यानंतर रुग्णालयाकडून उत्तर देण्यात आले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केईएम रुग्णालयात रविवारी सकाळी ५८ वर्षीय एका महिलेचा मृत्यू झाला. १४ मे रोजी महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी एका १३ वर्षीय मुलीचाही मृत्यू झाला. या दोघींनाही कोविड झालेला होता, असे म्हटले गेले. पण, रुग्णालयाने सुरूवातीला हे फेटाळले.
ठाकरेंच्या नेत्यांची केईएमला भेट
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि आमदार अजय चौधरी यांनी केईएम रुग्णालय प्रशासनाची भेट घेतली. भेटीवेळी प्रशासनाने दोघींचा मृत्यू कोविडमुळे झाल्याचे अमान्य केले.
वाचा >>नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि आमदार अजय चौधरी यांनी दोन्ही मयत रुग्णांना कोविड झाला होता, याचे पुरावे दाखवले. त्यानंतर रुग्णालयाने दोघींनाही कोविड झालेला होता, हे मान्य केले.
रुग्णालयाने काय सांगितलं?
न्यूज १८ च्या रिपोर्टनुसार केईएम रुग्णालयाने म्हटले की, दोन रुग्णाचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. पंरतू त्यातील एका रुग्णाला किडनीचा आजार होता, तर दुसऱ्या रुग्णाला कॅन्सर होता, असेही प्रशासनाने सांगितले.
किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?
"कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या ८ व्यक्तींना रुग्णालयाने सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे. प्रशासन देखील म्हणत आहे की, दोन रुग्णांचा मृत्यू झाला, त्यावेळी त्यांची चाचणी करण्यात आली; त्यात ते कोरोनाबाधित होते. त्यांचा मृतदेह घरच्यांना न देता कोविड मृतांवर जसे अंत्यसंस्कार करतात, तसेच त्यांच्यावरही करण्यात आले. रुग्णालय सुरूवातीला टाळत होते. आम्ही वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली", अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.
दरम्यान, मुंबईमध्ये ८ कोविडबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.