मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुरुवारी मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण नोंदविण्यात आले. कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम दिशेला पुढे सरकत असून, मुंबई आणखी दोन दिवस ढगाळ नोंदविण्यात येईल. तर उत्तरेकडील थंड वारे आणि बंगालच्या उपसागरातून येणारे वारे यामुळे मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांत मेघगर्जनेसह गारपीट होईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिली. बुधवारी मुंबई किंचित ढगाळ होती. गुरुवारी यात आणखी भर पडली. ढगाळ वातावरणामुळे तापमानातही चढउतार नोंदविण्यात येत असून, गुरुवारी मुंबईसह आसपासच्या परिसरातील कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात आली. विशेषत: मुंबईच्या कमाल तापमानात कमालीची वाढ नोंदविण्यात आली असून, बुधवारी मुंबईचे कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. देशभरातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत झाली.दुसरीकडे राज्याच्या वातावरणातही उल्लेखनीय बदल होत असून, उत्तर महाराष्ट्राला गारपिटीचा इशारा देण्यात आला असतानाच ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत उत्तर महाराष्ट्राच्या कमाल तापमानात घट होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि पालघर येथील कमाल तापमान २४ ते २६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मुंबई ढगाळ, उत्तर महाराष्ट्राला गारपिटीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 09:20 IST