लग्न मोडल्याच्या रागातून शिक्षकानं 'ती'चे अश्लील व्हिडीओ केले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 14:02 IST2018-09-26T13:59:23+5:302018-09-26T14:02:26+5:30
बोगस 'फेसबुक' अकाऊंट तयार करुन तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार वांद्रे येथे घडला आहे.

लग्न मोडल्याच्या रागातून शिक्षकानं 'ती'चे अश्लील व्हिडीओ केले व्हायरल
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई - बोगस 'फेसबुक' अकाऊंट तयार करुन तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार वांद्रे येथे घडला आहे. याप्रकरणी क्राईम ब्रांचनं प्रशांत प्रभाकर मेढे (वय 30 वर्ष) नावाच्या व्यक्तीला मंगळवारी पुण्यातून अटक केली आहे. वांद्रेतील खेरवाडी येथील हा प्रकार आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेला प्रशांत मेढे हा पेशानं शिक्षक आहे.
लग्न जुळवणाऱ्या एका संकेतस्थळावरून मेढेसोबत खेरवाडीमध्ये राहणाऱ्या तरुणीचे लग्न जुळवण्यात आले. मात्र दोन्ही कुटुंबीयांमध्ये काही कारणांवरुन वाद झाले आणि मुलीकडील लोकांनी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा चिडलेल्या मेढेने मुलीला अद्दल घडवण्याचे ठरवले. ऑगस्ट २०१७ पासून मेढे तरुणीसंबंधित अश्लील पोस्ट, व्हिडीओ आणि फोटो अपलोड करत होता. याप्रकरणी फेब्रुवारी २०१८ मध्ये मेढेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. सलग सहा महिने कसून तपास करत मेढेला पुण्यातून क्राईम ब्रांचने जेरबंद केले.
पुण्यात मेढे हा एक खासगी शिकवणी चालवत होता,शिवाय मॉलमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे. अटकेची कारवाई केल्यानंतर त्याने क्राईम ब्रांचसमोर गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील चौकशी खेरवाडी पोलीस करत आहेत.