मुंबई शहराला पडला अतिक्रमणांचा वेढा; सर्वपक्षीय आमदारांचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 06:51 IST2025-07-15T06:51:26+5:302025-07-15T06:51:41+5:30

कारवाई होत नसल्याने विधानसभेत संताप; कठोर कारवाई करण्याचे एकनाथ शिंदे यांचे आदेश

Mumbai city under siege of encroachments; MLAs from all parties attack the government | मुंबई शहराला पडला अतिक्रमणांचा वेढा; सर्वपक्षीय आमदारांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई शहराला पडला अतिक्रमणांचा वेढा; सर्वपक्षीय आमदारांचा सरकारवर हल्लाबोल

लोकमत न्यूज  नेटवर्क
मुंबई : मुंबईतील फुटपाथसह अनेक जागांना अतिक्रमणांचा अन् अनधिकृत बांधकामांचा वेढा पडला असून त्यावर कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या सर्वपक्षीय सदस्यांनी सोमवारी विधानसभेत सरकारवर हल्लाबोल केला. त्यावर असे अतिक्रमण ज्यांच्या क्षेत्रात झालेले आहे ते महापालिकेचे सहायक आयुक्त आणि संबंधित पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

विलेपार्ले पूर्व येथील महापालिकेच्या भूखंडावरील अतिक्रमणाबाबतचा मूळ प्रश्न भाजपचे पराग अळवणी यांनी विचारला होता. हे अतिक्रमण काढण्यात आले असल्याचे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले. मात्र, यानिमित्ताने मुंबईतील अनेक अतिक्रमणांवरून दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रश्नांची सरबत्ती केली. 

अतिक्रमणांसाठी स्थानिक सहायक आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा सरकारचा ‘जीआर’ आहे; पण आजवर तशी कोणावरही कारवाई का झाली नाही, असा सवाल सदस्यांनी केला. 
उद्धवसेनेचे वरुण सरदेसाई यांनी वेस्टर्न एक्स्प्रेस-वेच्या सर्व्हिस रोडवर गॅरेज, कटिंग सलूनपासून अनेक अतिक्रमणे आहेत. 
अधिकारी ते तोडायला गेले की, अतिक्रमण करणारे महिलांना समोर करून कारवाई थांबवतात, असे सांगितले. अमिन पटेल, हरुण खान, मुरजीभाई पटेल, दिलीप वळसे-पाटील, बाळा नर  आदी सदस्यांनी अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. 

अध्यक्षांचे सरकारला निर्देश
मुंबईतील आमदारांनी त्यांच्या भागातील सरकारी, महापालिका जागांवरील अतिक्रमणांची माहिती माझ्याकडे द्यावी, ती मी लगेच राज्यमंत्री मिसाळ यांच्याकडे देईन आणि ही अतिक्रमणे हटविण्याची कुठली कारवाई केली हे पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी राज्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगावे, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.

न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू 
वसई-विरार महापालिकेत किती प्रचंड अतिक्रमणे आहेत, याची धक्कादायक आकडेवारी भाजपचे राजन नाईक यांनी दिली. तेथे कोणालाही पाठीशी न घालता आणि न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमणे काढली जात आहेत, अनधिकृत बांधकामे पाडली जात आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आपापल्या क्षेत्रातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांची यादी सरकारला सादर करण्याचे आदेश सर्व महापालिका आयुक्तांना दिले जातील आणि नंतर ती हटविण्याची कारवाई केली जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mumbai city under siege of encroachments; MLAs from all parties attack the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.